
>> द्वारकानाथ संझगिरी
पाऊस किंचित रिमझिम होता. आकाशात ढग होते. आजूबाजूची वनश्री पाण्याच्या शिडकाव्याने मीलनोत्सुक प्रेयसीसारखी रोमांचित झाल्यासारखी वाटत हाती. हवेत एक प्रकारचा गोड गारठा होता आणि आम्ही ‘हेस्टिंग्ज’ या गावाला निघालो होतो. हेस्टिंग्ज हे ससेक्स परगण्यातलं इंग्लिश खाडीच्या काठावरचं गाव. आता ते मासेमारीचं एक बंदर आहे, पण आपल्याकडे जसा ‘पानिपत’ला इतिहास आहे तसा हेस्टिंग्ज या छोटय़ा शहराला आहे. एक गोष्ट सांगायची राहिलीच, ‘आम्ही’ म्हणजे नेमके कोण ते! आम्ही म्हणजे मी आणि डॉ. गोविंद काणेगावकर. इतिहासाच्या खाणाखुणा शोधायची आम्हा दोघांनाही हौस आहे. त्यांच्याइतक्या प्रेमाने मला कुणी ऐतिहासिक स्थळं फिरवलेली नाहीत. या हेस्टिंग्जचा वॉरन हेस्टिंग्ज या ब्रिटिश गव्हर्नर जनरलशी संबंध नसावा. कारण तो चर्चिल या ऑक्सफर्डशायरमधल्या गावात जन्मला होता. असतीलही त्याचे पूर्वज इथले, पण मला कल्पना नाही. तसं काही सापडलंही नाही. वॉरन हेस्टिंग्जचं नाव घेतलं. कारण ‘हेस्टिंग्ज’ हा शब्द शालेय इतिहासात त्यांच्यामुळेच कानावर पडतो, पण या ‘हेस्टिंग्ज’ गावचं माहात्म्य वेगळंच आहे. 1066 साली इथे एक लढाई झाली. त्यानंतर इंग्लंडचा राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास बदलला.
1066 मध्ये फ्रान्सच्या डय़ूक ऑफ नॉरमॅंडीने इंग्लंडवर हल्ला केला. त्याचं नाव ‘विल्यम’. इंग्लंडच्या इतिहासात त्याचा उल्लेख ‘विल्यम द कॉन्करर’ असाही होतो आणि ‘विल्यम द बास्टर्ड’ असासुद्धा!
‘विजेता’ कारण त्यानं इंग्लंड जिंकलं. ‘बास्टर्ड’ कारण तो रॉबर्ट या डय़ूक ऑफ नॉरमॅंडीला त्याच्या ठेवलेल्या बाईपासून झाला होता. या हेस्टिंग्जला तो उतरला आणि आता जिथे बॅटल नावाचं गाव आहे, तिथे ही लढाई झाली. गावाचं नावंच बॅटल पडलं. इंग्लंडचा राजा हॅरॉल्डचा पराभव त्याने 14 ऑक्टोबरला केला. डोळय़ात बाण लागून हॅरॉल्ड मेला आणि मग पुढे ख्रिसमसला म्हणजे 25 डिसेंबरला विल्यम्सचा इंग्लंडचा राजा म्हणून राज्याभिषेक झाला.
ही एका दिवसाची लढाई होती. तुम्ही विचाराल, त्या लढाईचं एवढं काय महत्त्व? दोन-तीन महत्त्वाच्या गोष्टी या युद्धामुळे झाल्या. विल्यमपूर्वी तिथे ऍंग्लो-सॅक्सन जमातीचं राज्य होतं. साधारण पाचव्या शतकापासून 1066 पर्यंत युरोपमधून आलेली काही जर्मन वंशाची मंडळी इंग्लंडमध्ये स्थिरावली आणि तिथल्या स्थानिक जमातींनी मग त्यांची संस्कृती, त्यांची भाषा स्वीकारली. याच काळात तिथे ख्रिस्ती धर्म स्थापन झाला. ‘ऍंग्लो- सॅक्सन’ हा शब्द या मंडळींच्या भाषेसाठी जास्त वापरला जातो. त्याला ‘जुनं इंग्लिश’ही म्हणतात. इंग्लंड एक देश म्हणून बीज हे या अंग्लो- सॅक्सन काळात रोवलं गेलं आणि विल्यमच्या विजयानंतर ते फोफावलं. म्हणजे विल्यमने एकसंध इंग्लंडचा पाया घातला.
या युद्धानंतर इंग्लंडमध्ये तीन भाषा होत्या. एक जुनं इंग्लिश. अंग्लो- सॅक्सन मंडळी आपापसात त्याच भाषेत बोलत. चर्चमध्ये लॅटिन भाषा वापरली जाई आणि राज्यकर्त्याशी बोलताना फ्रेंचचा वापर होई. त्यातून मग पुढे ‘इंग्लिश भाषा’ आपलं रूप बदलत गेली. विल्यम हा जरी परदेशी आक्रमक असला तरी तो इंग्लिश इतिहासाचा मानबिंदू ठरला. त्याने त्या काळात अनेक किल्ले बांधले. ‘टॉवर ऑफ लंडन’ किंवा ‘द व्हाईट टॉवर’ तेव्हाचाच. त्यामुळे त्यांना सुरक्षितपणे राहता आलं आणि स्थानिक अंग्लो-सॅक्सनने बंड केले तर ते मोडता आले. त्याच्या शासनाचं कौतुक झालं.
1065 नंतर कुणीही इंग्लिश खाडी ओलांडून इंग्लंडवर हल्ला केला नाही. दुसऱया महायुद्धात हिटलरचीही हिंमत झाली नाही. ‘इंग्लिश खाडी’ ही इंग्लंडसाठी कवचकुंडलं ठरली. सध्या हेस्टिंग्जमध्ये वाळूच्या गोटय़ांचा किनारा आहे. उद्ध्वस्त झालेला किल्ला आहे. त्यात हा विल्यम राहिला होता. फिशरमन्स म्युझियम आहे आणि डोंगरावर अठ्ठय़ाहत्तर अंशाच्या कोनात वरखाली करणारी रेल्वे आहे. अगदी इतिहास सोडा, पण एक दिवस मजेत घालवावा असं ते पिटुकलं शहर आहे.
तिथून आम्ही ‘टाय’ गावात गेलो. गावासारखं ते गाव आहे. समुद्रकिनारा आहे, बंदर आहे. मस्त खाडीच्या रस्त्यावरून चार किलोमीटर चालत समुद्राकडे गेलो. जाता येता ‘जंगली ब्लॅक बेरी’ खाल्ली. थेट जाळीवरून! अगदी आपल्याकडे आपण करवंदे खातो तशी. कदाचित ती कुठेही जन्माला येते म्हणून तिला जंगली म्हणत असावेत. एरवी ती घरच्या बागेसारखी मिठास होती. बऱयाच ‘गोड’ गोष्टींचा मार्ग काटय़ांतून जातो हेच खरं.
पण आमचं तिथे जायचं कारण वेगळं होतं. ते आर्थर वेलस्लीच्या घोडय़ाच्या टापाने शहारणारं छोटं शहर होतं. आर्थर वेलस्ली कोण? तुमचा प्रश्न मला कळला.चला, बोट धरून मी तुम्हाला पुन्हा इतिहासात घेऊन जातो.
हा वेलस्ली मूळचा आयरिश. तो आयरिश हाऊस ऑफ कॉमन्सचा जनतेने निवडलेला प्रतिनिधी असला तरी मूळ पेशा शस्त्र्ााने खेळण्याचा. त्यानेच हिंदुस्थानात श्रीरंगपट्टणमला टिपू सुलतानला हरवलं. त्याला टिपू सुलतानच्या मृत्यूची बातमी कळली तेव्हा तो स्वतः तिथे गेला आणि त्याने टिपू सुलतानची नाडी पाहिली. तो कठोर शासक होता. त्याने स्वतःच्या बेशिस्त सैनिकांनाही फासावर चढवलं. गंमत पहा. या टिपू सुलतानला हरवायला या ब्रिटिशांनी मदत कुणाची घेतली, तर मराठय़ांची आणि मग त्यानंच मराठय़ांवर हल्ला चढवला.असे ब्रिटिश कावेबाज आणि आपण मात्र एकमेकांच्या उरावर बसलेलो.
या आर्थर वेलस्लीने नंतर नेपोलियनला वॉटर्लूच्या लढाईत हरवले आणि मग तो डय़ूक ऑफ वेलिंग्टन झाला. लंडनला जाताना ज्या खंडाळ्याला आपण ‘डय़ूक्स नोज’ म्हणतो ते या वेलिंग्टनचं. त्यानंतर तो देशाचा पंतप्रधान झाला. तो निवडून आला तो ‘टाय’मधून. आलं लक्षात ‘टाय’ला जायचं कारण? यापुढे मी ठरवलंय, इंग्लंडला गेल्यावर डॉ. काणेगावकरांबरोबर ऐतिहासिक प्रदेश, स्थळं फिरायची आणि मग माझ्या लेखणीचं बोट धरून तुम्ही त्याचा आस्वाद घ्यायचा.
ठरलं मग? कसा आहे सौदा?





























































