
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आशिया कपमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात हिंदुस्थानने बांगलादेशचा 7 विकेट्ने पराभव केला. या सामन्यात हिंदुस्थानी क्रिकेट संघातील गब्बर अर्थात शिखर धवन याने फलंदाजीसह क्षेत्ररक्षणामध्येही दमदार कामगिरी करत आपल्या नावाची नोंद एका अनोख्या यादीत केली आहे.
वर्ल्डकपच्या दृष्टीने कार्तिक-रायडूऐवजी ‘या’ फलंदाजांना संधी द्यावी!
बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात धवनने दमदार क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर केला. या दरम्यान त्याने चार बांगलादेशी फलंदाजांचे कॅच पकडले. धवनने नजमुल, शाकिब अल हसन, मेहंदी आणि मुस्तफिजूर या चौघांचा कॅच घेत क्षेत्ररक्षणामध्ये चौकार ठोकला. एकाच सामन्यात यष्टीरक्षक नसताना चार कॅच घेणारा धवन सातवा हिंदुस्थानी खेळाडू ठरला आहे.
480 दिवसानंतर संघात आला अन् मैदान मारून गेला
हिंदुस्थानकडून सर्वात प्रथम एकाच सामन्यात यष्टीरक्षकाव्यतिरिक्त क्षेत्ररक्षकाने चार कॅच घेण्याचा कारनामा सुनील गावसकर यांनी केला होता. त्यांनी 1985 मध्ये शारजाह येथे पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात चार कॅच पकडले होते. गावसकरनंतर अशी कामगिरी करणारे हिंदुस्थानी खेळाडू पुढीलप्रमाणे –
> अझरुद्दीनने 1997 मध्ये टोरंटो येथे पाकिस्तानविरुद्ध चार फलंदाजाचे कॅच पकडले.
> सचिनने 1998 मध्ये पाकिस्तानिविरुद्ध चार फलंदाजांचे कॅच पकडले.
> द वॉल राहुल द्रविडने 1999मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध टोरंटो वन डेमध्ये चार कॅच पकडण्याची कामगिरी केली.
> मोहम्मद कैफने 2003मध्ये श्रीलंकेविरुद्ध चार कॅच पकडत या यादीत स्थान मिळवले.
> लक्ष्मणने 2004मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध चार कॅच पकडण्याची व्हेरी व्हेरी स्पेशल कामगिरी केली.
एकाच सामन्यात यष्टीरक्षकाव्यतिरिक्त चारपेक्षा जास्त कॅच घेण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या जॉन्टी ऱ्होड्सच्या नावावर आहे. त्याने 1993 मध्ये वेस्ड इंडिजविरुद्ध एक दिवसीय सामन्यात पाच कॅच पकडले होते.



























































