राफेलचे भूत मानगुटीवर, पंतप्रधान मोदींकडून खुलासा नाहीच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pm-modi-rafale

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘राफेल’ लढाऊ विमाने खरेदी करारावर फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांच्या खळबळजनक गौप्यस्फोटानंतर हिंदुस्थानचे राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले असून विरोधक आणि सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे ‘बॉम्बहल्ले’ सुरू झाले आहेत. नवनवीन पुरावे दोन्ही बाजूंनी समोर आणले जात आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर गप्पच आहेत. ‘राफेल’चे भूत मोदी सरकारच्या मानगुटीवर बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हा राफेल करार म्हणजे पंतप्रधान मोदींनी आपल्याच लष्करावर 1.30 लाख कोटी रुपयांचा केलेला ‘सर्जिकल स्ट्राइक’ असल्याचा हल्लाबोल केला आहे. यावर कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी राफेल प्रकरणात रिलायन्स कंपनीचे नाव युपीए सरकारच्या काळापासून चर्चेत होते. आमच्याकडे पुरावे असल्याचा दावा केला आहे.

हिंदुस्थान सरकार फ्रान्सकडून 36 राफेल विमाने खरेदी करणार आहे. 7.87 अब्ज युरोचा हा करार आहे. फ्रान्सची कंपनी ‘दॅसॉ एविएशन’ आणि उद्योगपती अनिल अंबानी यांची ‘रिलायन्स’ यांच्यात हा करार झाला असून, हा करार पूर्णपणे व्यवसायिक असल्याचा दावा मोदी सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे. पण काल शुक्रवारी फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी बॉम्बगोळाच टाकला. अनिल अंबानी यांच्या रिलायन्सचे नाव हिंदुस्थान सरकारनेच सुचविले होते, असे ओलांद यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे मोदी सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

काँगेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ओलांद यांच्या म्हणण्यानुसार राफेल करारासाठी अनिल अंबानींच्या कंपनीची निवड करण्यात फ्रान्स सरकारची कोणतीही भूमिका नव्हती. हिंदुस्थान सरकारकडूनच रिलायन्सचा प्रस्ताव ठेवला गेला होता.मोदी यांनीच अनिल अंबानी यांच्या कंपनीला 30 हजार कोटींचे हे गिफ्ट दिल्याचे स्पष्ट होत आहे. विमान बनविण्याचा कोणताही अनुभव रिलायन्सला नाही.‘राफेल’च्या करारापूर्वी 12 दिवस आधी अनिल अंबानी यांनी कंपनी स्थापन केली असा आरोपही राहुल गांधींनी केला. युपीएच्या काळात राफेलच्या एका विमानाची किंमत 520 कोटी रुपये होती. मग मोदी यांनी 1670 कोटी रुपयांना एक विमान खरेदी करण्याचा करार का केला? आम्ही 126 राफेल घेणार होतो. मोदींनी 36 विमानांचा करार केला आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

ओलांद आणि मोदी यांच्यात वन-टू-वन मिटिंग झाली होती. त्यामुळेच ओलांद यांच्या म्हणण्यात तथ्य आहे असे मानावे लागेल. आपले पंतप्रधान भ्रष्ट्राचारी आहेत असे जनतेलाही वाटू लागले आहे. यावर मोदींना बोलावेच लागेल. संरक्षणमंत्री निर्मला सितारामन, अर्थमंत्री अरूण जेटली बोलतात. पण पंतप्रधान मोदी गप्प का? असा सवाल राहुल गांधींनी केला आहे. आजपर्यंत पंतप्रधानांसाठी कोणीही ‘चोर’ अशा शब्दाचा प्रयोग केला नव्हता. राहुल गांधींकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा काय ठेवणार? गांधी घराणे हे भ्रष्टाचाराचे उगमस्थान आहे. राफेल करार काय आहे याबाबत राहुल गांधींना माहिती नसल्याचा टोला कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी लगावला.

ओलांद काय म्हणाले?
हिंदुस्थान सरकारनेच अनिल अंबानी यांच्या रिलायन्सचे नाव सुचविले होते. त्यानुसार ‘दॅसॉ एव्हिएशन’ने रिलायन्सशी संपर्क केला. आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

दोन कंपन्यांमधील व्यावसायिक करार- संरक्षण मंत्रालय
फ्रान्सचे माजी राष्ट्रपती ओलांद यांच्या गौप्यस्फोटानंतर उठवलेल्या वादळावर संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रक काढून खुलासा केला आहे. ‘राफेल’ करार कोणत्या कंपनीबरोबर करावा यात केंद्र सरकारची कोणतीही भूमिका नव्हती. सरकारने कोणत्याही कंपनीची शिफारस केली नव्हती. फ्रान्सची कंपनी ‘दॅसॉ एविएशन’ आणि हिंदुस्थानची रिलायन्स यांच्यात झालेला हा करार आहे. त्यामुळे राफेल करारावरून विनाकारण वादविवाद केला जात आहे, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

हिंदुस्थानचा दबाव होता का? याबाबत दॅसॉला विचारा – ओलांद
फ्रान्सचे माजी राष्ट्रपती ओलांद यांच्या नवीन विधानामुळे राफेलचा वाद आणखी पेटणार आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्सबरोबर करार करावा यासाठी दॅसॉ एव्हिएशनवर दबाव होता का, असा प्रश्न आज एएफपी या वृत्तसंस्थेने ओलांद यांना विचारला असता याबाबत दॅसॉलाच विचारा असे उत्तर त्यांनी दिले आहे.

ओलांद यांनी पंतप्रधान मोदींना चोर म्हटले आहे
‘राफेल’ करारावरून फ्रान्सचे माजी राष्ट्रपती ओलांद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे. ओलांद यांनी अप्रत्यक्षरीत्या पंतप्रधान मोदी हे चोर असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान आता मौन बाळगून का आहेत, असा थेट सवाल करीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर हल्ला चढविला. मोदींनी आपल्या लष्करावर 1.30 लाख कोटी रुपयांचा सर्जिकल स्ट्राइक केला आहे. पत्रकार परिषद आणि ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला.

राहुल गांधी मूर्ख; त्यांना शिकवावे लागेल
राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींसाठी ‘चोर’ शब्दाचा वापर केल्यामुळे कायदामंत्री रविशंकर प्रसाद भडकले. राहुल गांधी हे मूर्ख असून त्यांना आपल्याला शिकवावे लागेल, असे प्रसाद यांनी म्हटले आहे. राफेल प्रकरणात रिलायन्स कंपनीचे नाव ‘युपीए’ सरकारच्या काळापासून चर्चेत होते. या संबंधीचे पुरावे आमच्याकडे आहेत. अनिल अंबानी यांना करारात सहभागी करून घेण्याचा निर्णय फ्रान्स सरकारचाच आहे. युपीएने केलेल्या राफेल करारातील किमतीपेक्षा आम्ही करार केलेल्या विमानांची किंमत 20 टक्क्यांनी कमी असल्याचा दावा प्रसाद यांनी केला. राफेल कराराचा सर्व तपशील उघड करून पाकिस्तान आणि चीनला सर्व गुपीत कळावे असे राहुलना वाटते का, असा सवाल प्रसाद यांनी केला.

‘तो’ निर्णय आमचा
फ्रान्सची एअरोस्पेस कंपनी ‘दॅसॉ एविएशन’ने ही भूमिका मांडली आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्सबरोबर करार करण्याचा निर्णय आमचा होता, असे ‘दॅसॉ एविएशन’ने म्हटले आहे. पण रिलायन्सचे नाव हिंदुस्थान सरकारने सुचविले होते का? यावर खुलासा केलेला नाही.

हिंदुस्थानची कंपनी आम्ही निवडली नाही
हिंदुस्थानातील कोणत्या कंपनीबरोबर राफेल करार करावा यात आमचा कोणताही हस्तक्षेप नव्हता. आम्ही हिंदुस्थानची कंपनी करारासाठी निवडली नव्हती, अशी स्पष्ट भूमिका फ्रान्स सरकारने आज मांडली आहे. फ्रान्सची कंपनी ‘दॅसॉ एविएशन’ला आम्ही स्वातंत्र्य दिले होते. कोणत्या हिंदुस्थानी कंपनीबरोबर करार करावा याचा निर्णय ‘दॅसॉ एविएशन’ने घ्यावा अशी आमची भूमिका होती, असे फ्रान्स सरकारने स्पष्ट केले आहे.

10 एप्रिल 2015 रोजी मोदींनी कराराची घोषणा केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्रपती ओलांद यांच्यात 10 एप्रिल 2015 रोजी बैठक झाली. या बैठकीनंतर मोदींनीच 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर अंतिम करार 23 सप्टेंबर 2016 रोजी झाला.

राफेल व्यवहारात फायदा कोणाचा झाला ते बघू नका…
ठाणे – कोणत्याही करारात मध्यस्थ लागतोच. मग तो अदानी असो की अंबानी.. राफेल व्यवहारात कोणाचा फायदा झाला हे महत्त्वाचे नाही. विरोधक त्यावरून विनाकारण गदारोळ करत आहेत, अशी मल्लिनाथी केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे केली. फ्रान्सबरोबर तत्कालीन यूपीए सरकारने केलेला राफेल लढाऊ विमानांचा करार मोडून केंद्रातील मोदी सरकारने नव्या करारात उद्योगपती अनिल अंबानींच्या कंपनीला हजारो कोटी रुपयांचा फायदा करून दिल्याच्या मुद्दय़ावरून विरोधकांनी देशभरात वादळ उठवले आहे. ठाण्यात एका पत्रकार परिषदेत आठवले यांना याबाबत विचारले असता त्यांनी व्यवहार आला की मध्यस्थ आलाच… आणि व्यवहारात फायदा कुणाला होतो हे न बघता देशाला लढाऊ राफेल विमाने मिळाली ते बघा, असे सांगितले.

summary- pm modi did not explained about rafael deal