यंदा ऑस्करच्या स्पर्धेत आसामी सिनेमा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

यंदा हिंदुस्थानकडून प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या ‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी ‘व्हिलेज रॉकस्टार्स’ या आसामी चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. रीमा दास दिग्दर्शित या चित्रपटाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले असून सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट विभागासाठी हिंदुस्थानकडून या चित्रपटाची निवड झाली आहे. ‘एफएफआय’ अर्थात भारतीय चित्रपट महामंडळाने आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली.

‘ऑस्कर’ पुरस्काराच्या निवड समितीचे अध्यक्ष एस. व्ही. राजेंद्र सिंग बाबू यांनी ‘व्हिलेज रॉकस्टार्स’ चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाने 70 प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत.

या चित्रपटांना मागे टाकले

‘व्हिलेज रॉकस्टार्स’ने ‘पद्मावत, ‘राझी’, ‘हिचकी’, ‘लव्ह सोनिया’, ‘तुंबड’, ‘हलका’, ‘कडवी हवा’ आणि नुकताच प्रदर्शित झालेला ‘मंटो’ अशा 28 चित्रपटांना मागे टाकले आहे.

‘मदर इंडिया’ (1958), ‘सलाम बॉम्बे’ (1989) ‘लगान’ (2001) या चित्रपटांनी टॉप फाईव्ह सिनेमांमध्ये स्थान पटकावले होते.

मागील वर्षी ‘न्यूटन’ या अमित मसुरकर दिग्दर्शित सिनेमाची हिंदुस्थानकडून ‘ऑस्कर’साठी घोषणा झाली होती.