हिमाचलवर आभाळ कोसळले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । सिमला 

केरळनंतर हिमाचल प्रदेशावर आभाळ कोसळले आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी झाली असून बर्फवृष्टीमुळे राज्यातील दळणवळणच ठप्प झाले आहे. व्याससहीत अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने रस्ते वाहून गेले आहेत, पूल बेपत्ता झाले आहेत. दोन दिवसांपासून होत असलेल्या वादळी पावसामुळे या डोंगरी राज्याची पार दैना उडाली आहे.

महिनाभरापूर्वी केरळात आभाळच फाटले होते. तब्बल आठ दिवस संपूर्ण राज्य जलमय झाले होते. हिमाचल प्रदेशातही दोन दिवसांपासून वादळी पाऊस होत आहे. अनेक वर्षानंतर सप्टेंबरमध्ये बर्फवृष्टी झाली असून त्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. अनेक ठिकाणी ढगफुटी झाल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे कुलु मनाली, रोहतांग, लेह, सिमला हे राष्ट्रीय महामार्ग बंदच झाले आहेत. राज्यभरात जवळपास 300 रस्त्यांवर गुडघाभर बर्फ साचल्याने जागोजाग वाहने फसली आहेत. रोहतांग दर्रा या मार्गावर चार फूट बर्फ साचला आहे. या भागात फसलेल्या पर्यटकांसह 23 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून मढी येथे मदत शिबिरात पाठवण्यात आले आहे. लाहौल स्पिती येथे गंगस्टाँग ग्लेशियरमध्ये संशोधनासाठी गेलेले पश्चिम बंगालचे नऊ संशोधक वादळवाऱयामध्ये बेपत्ता झाले आहेत.

विक्रमी बर्फवृष्टी

तब्बल 20 वर्षांनंतर रोहतांग येथे चार फूट बर्फवृष्टी झाली. याशिवाय केलांग, मणिमहेश, पांगी, तीसा येथेही तुफान बर्फवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. चंबा, उना तसेच विलासपूर या शहरांचीही मुसळधार पावसाने दैना उडवली आहे. व्यास,दोबी, रावी आदी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक ठिकाणी नद्यांनी पात्रच बदलले आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची पथके काही ठिकाणी तात्काळ मदतीसाठी तैनात करण्यात आली आहेत.