रेशन कार्डवर ‘कुत्रा’ घेत होता धान्य, आधार कार्डने केली पोलखोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भोपाळ

आधार कार्डाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केले आहे. याचदरम्यान, मध्य प्रदेशमध्ये आधार कार्डशी संबंधित अजब घटना घडल्याचे समोर आले आहे. येथील धार जिल्हयात एकजण पाळीव कुत्र्याचे नाव रेशन कार्डवर नोंदवून त्याच्या नावाने वर्षभरापासून धान्य घेत असल्याचे उघड झाले आहे. रेशन कार्डवर नोंदवलेल्या नावांची खातरजमा करण्यासाठी दुकानदाराने त्याच्याजवळ आधार कार्डची मागणी केली. तेव्हा ही घटना उघड झाली आहे. नरसिंह बोदर (६०) असे या व्यक्तीचे नाव असून ‘राजू’ असे त्याच्या कुत्र्याचे नाव आहे.

ration-card

नरसिंह यांच्याकडे राजू नावाचा कुत्रा असून संपूर्ण कुटुंबाचा तो लाडका आहे. कुत्रा असला तरी नरसिंह यांनी त्याला आपला मुलगा म्हणून घोषित केले होते. यामुळे तो त्यांच्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणूनच गावात ओळखला जातो. याचाच गैरफायदा घेत नरसिंह यांनी ग्राम पंचायतीकडून बोगस रेशन कार्ड बनवून घेतले. त्यात आपल्या दोन मुलांबरोबरच राजूचे नावही नोंदवण्यात आले. त्याच्यासमोर मुलगा म्हणून लिहण्यात आले. दरमहिन्याला प्रत्येक व्यक्तीच्या नावाने नरसिंह यांना ५ किलो धान्य रेशन दुकानातून मिळत होते. त्यानुसार वर्षभरात कुत्र्याच्या नावावर नरसिंह यांनी ६० किलो धान्य घेतले होते. दरम्यान सरकारी सेवेचा लाभ घेणाऱ्यांचे आधार कार्ड तपासण्याचे आदेश वरिष्ठांकडून आले. यामुळे रेशन दुकानदाराने नरसिंह यांच्याकडे त्यांच्या रेशन कार्डवर नोंदवण्यात आलेल्या तीन व्यक्तींचे आधार कार्ड मागितले. यावर नरसिंह यांनी फक्त दोनच आधार कार्ड दुकानदाराला दाखवले. यामुळे दुकानदाराने तिसऱ्या राजू नामक व्यक्तीचे आधार कार्ड कुठे आहे असे नरसिंह यांना विचारले. त्यावर राजू व्यक्ती नसून आमचा पाळीव कुत्रा आहे. तो माझा मुलगाच आहे, असे नरसिंह यांनी सांगितले. नरसिंह यांचे हे उत्तर ऐकून दुकानदार व वरिष्ठ अधिकारी हैराण झाले. या प्रकारामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली.

अखेर अन्न निरीक्षक अनुराग वर्मा यांनी रेशन कार्डवरून राजू या कुत्र्याचे नाव हटवण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.

summary-man taking ration on dogs name