
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवादी कनेक्शनप्रकरणी पुणे पोलिसांनी पाच शहरी माओवाद्यांवर केलेली कारवाई योग्य असल्याचे आज सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट झाले. कोणत्याही राजकीय हेतूने किंवा असहमतीमुळे अटक केलेली नाही, तर प्रथम दर्शनी ‘त्या’ पाच जणांचे बंदी घातलेल्या भाकप (माओवादी) संघटनेशी संबंध असल्याचे पुढे आले आहे असा निर्वाळा न्यायालयाने दिला. तसेच या प्रकरणाचा ‘एसआयटी’मार्फत तपास करण्याची मागणी फेटाळली. ‘त्या’ पाच जणांची नजरकैद आणखी चार आठवडे वाढविली आहे.
1 जानेवारी 2018 रोजी पुणेनजीक भीमा-कोरेगाव येथे हिंसाचार उसळला होता. त्याच्या एक दिवस आधी पुण्यात शनिवारवाडा येथे ‘एल्गार’ परिषद झाली होती. भीमा-कोरेगाव दंगलीचा तपास करताना पुणे पोलिसांना शहरी नक्षलवाद्यांच्या कनेक्शनचे धागेदोरे आणि पुरावे हाती लागले. 28 ऑगस्टला देशाच्या विविध भागात धाडी टाकून तेलगू कवी वरवरा राव यांच्यासह सुधा भारद्वाज, अरूण परेरा, वर्नेन गोन्साल्वीस आणि गौतम नवलखा यांना अटक केली. या अटकेविरूद्ध काही विचारवंत, ज्येष्ठ वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. रोमिला थापर, देवकी जैन, प्रभात पटनायक, सतीश देशपांडे, माया दारूवाला यांनी याचिका दाखल केली. पुणे पोलिसांची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. त्यामुळे विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी)तपास करावा अशी मागणी केली होती. आज सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपिठापुढे सुनावणी झाली.
न्या. चंद्रचूड काय म्हणाले…
न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी आपल्या स्वतंत्र निकालपत्राचे वाचन केले. या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत सुप्रिम कोर्टाच्या निगराणीखाली केला जावा असे न्या. चंद्रचूड म्हणाले. या प्रकरणात पुणे पोलिसांचे वर्तन योग्य नव्हते. अटक करण्यात आलेल्या पाच जणांचे नक्षली संबंध असल्याचे आढळून आलेले नाही. त्यामुळे अंदाज बांधून स्वातंत्र्याचे हनन करता येणार नाही. न्यायालयाने याबाबत सावध राहिले पाहिजे. पोलिसांकडून मिडीया ट्रायलला मदत केली जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर संशय निर्माण होतो असे मत न्या. चंद्रचूड यांनी व्यक्त केले आहे.
दोन विरुद्ध एक न्यायमूर्ती असा बहुमताने निर्णय दिला
‘त्या’ पाच जणांची नजरकैद आणखी चार आठवडय़ांनी वाढविली आहे. या काळात जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
‘एसआयटी’ चौकशीची मागणी फेटाळताना न्यायमूर्ती खानविलकर यांनी कडक शब्दांत फटकारले. तपास कशा पद्धतीने करावा, कोणत्या यंत्रणेमार्फत करावा हे आरोपी ठरवू शकत नाही असे न्या. खानविलकर म्हणाले.
राजकीय हेतूने किंवा राजकीय असहमतीमुळे ‘त्या’ पाच जणांवर अटकेची कारवाई केल्याचा आरोप न्यायालयाने फेटाळला. प्राथमिक तपासात ‘त्या’ पाचजणांचे बंदी असलेल्या भाकप (माओवादी) संघटनेशी संबंध असल्याचे दिसत आहे असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदविले.

























































