
सामना प्रतिनिधी । मुंबई
एल्फिन्स्टन रोड पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत असून या घटनेतून रेल्वे प्रशासनाने अजूनही पुरेसा धडा घेतलेला नाही. या घटनेनंतर परळ-एल्फिन्स्टन रोड (प्रभादेवी) स्थानकात दोन पादचारी पूल बांधण्यात आले असले तरी मूळ अरुंद पुलाची समस्या कायम आहे, तर दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण स्थानकात वाढत्या गर्दीमुळे दुसरे एल्फिन्स्टन घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
29 सप्टेंबर रोजी एल्फिन्स्टन रोड पादचारी पुलावर चेंगराचेंगरीत 23 जणांचा हकनाक बळी गेला होता. या दुर्घटनेच्या महिनाभरानंतर रेल्वेमंत्र्यांनी लष्कराच्या मदतीने आंबिवली, करी रोड आणि एल्फिन्स्टन रोड (प्रभादेवी) येथे लष्कराच्या मदतीने 31 जानेवारी 2018 पर्यंत तीन पादचारी पूल उभारण्याची घोषणा केली. यथावकाश हे पूल उभेही राहिले. एल्फिन्स्टन रोड-परळ स्थानकात तर 12 मीटर रुंदीचा नवा पादचारी पूल उभारण्यात आला. मात्र परळ स्थानकाच्या दादर दिशेकडील आर्मीने बांधलेला पूल केवळ फूल मार्केटला जाणाऱया कामगारांच्या उपयोगाचा ठरला आहे. नव्या 12 मीटरच्या पुलामुळे परळच्या अरुंद पुलावरील गर्दी थोडी कमी झाली असली तरी या पुलाच्या पायऱया अतिशय चुकीच्या असून प्रवाशांची परीक्षा पाहणाऱया आहेत.
वर्षभरात 31 पादचारी पुलांची उभारणी
मध्य रेल्वेने वर्षभरात 20 पादचारी पूल उभारले असून 44 पादचारी पूल येत्या वर्षभरात उभारले जातील. तर पश्चिम रेल्वेने 11 पादचारी पूल तर दोन ठिकाणी पायऱयांचे काम असे 13 पादचारी पुलांचे काम गेल्या वर्षभरात केले असून आणखीन 25 पादचारी पूल येत्या आर्थिक वर्षात उभारले जातील. 2020 पर्यंत एकूण 130 पादचारी पूल बांधण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवर सध्या 114 पादचारी पूल असून त्यात मार्च 2019 पर्यंत आणखी चार पुलांची भर पडणार आहे. पश्चिम रेल्वेवर 1 एप्रिल 2018 पर्यंत 111 पादचारी पूल असून 2020 पर्यंत ही संख्या एकूण 130 पर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. त्याचप्रमाणेच प्रभादेवीसह (पूर्वीचे एल्फिन्स्टन स्थानक) अन्य स्थानकांवर पादचारी पुलाची मार्गिका विस्तार, अतिरिक्त पायऱया आदी कामे करण्यात आली आहेत.

























































