
सामना ऑनलाईन । चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात चिचगाव(डोर्लि) येथील 8 वर्षीय बालिकेवर घराच्या समोर रात्री 8.30 च्या दरम्यान बिबट्याने हल्ला करीत जबड्यात पकडले. मात्र जवळच असलेल्या मुलीच्या वडिलांनी बिबट्याचा पाय पकडून बिबट्याच्या जबड्यातून मुलीला सोडवण्याचा प्रयत्नात आरडाओरड केली आणि गावकऱ्यांनी राखलेल्या प्रसंगावधानामुळे मुलीचा प्राण वाचला. परिसरातील एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करा अशी मागणी गावकरी करीत आहेत.
हा अंगावर शहारे आणणारा भयावह प्रसंग चिचगाव येथील ऐश्वर्या राजेश्वर अलोणे या 8 वर्षीय बालिकेवर ओढवला. मात्र, देव तारी त्याला कोण मारी या म्हणी प्रमाणे बिबट्याच्या जबड्यातून ऐश्वर्याला सोडवण्याचा प्रयत्न खुद्द मुलीचे वडील राजेश्वर यांनी केले, त्यांच्या प्रयत्नांना गावकऱ्यांनी साथ दिली. राजेश्वर अलोणे व मुलगी ऐश्वर्या जेवणानंतर गावातील वीज पुरवठा खंडित झाला असल्याने व होणाऱ्या उकाड्याने घराच्या अंगणात उभे होते. त्याचवेळी अंधारात घराजवळच दबा धरून असलेल्या बिबट्याने ऐश्वर्यावर हल्ला करीत ऐश्वर्याची मान जबड्यात पकडली. त्याच वेळी राजेश्वरने बिबट्याचा मागचा पाय पकडून मुलीचा प्राण वाचविण्यासाठी आरडाओरड करू लागला व क्षणात गावातील लोक गोळा झाले. त्याचवेळी बिबट्याने जोराचा झटका देत ऐश्वर्याला जबड्यात घेऊन पळू लागला. गावकऱ्यांनी बिबट्याचा पाठलाग केला.
अखेर बिबट्याने जवळपास 300 मीटर अंतरावर ऐश्वर्याला सोडले व जंगलाच्या दिशेने पळून गेला. क्षणाचाही विलंब न लावता राजश्वरने गावकऱ्याच्या मदतीने जखमी अवस्थेत ऐश्वर्याला ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. झाल्या प्रकाराची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी देखील ग्रामीण रुग्णालयात आले. ऐश्वर्याच्या जखमांवर उपचार करण्यात आले.
summary- girl got saved from panther




























































