ईडीने अशी केली नीरव मोदी विरोधात कारवाई, 637 कोटींची संपत्ती जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंजाब नॅशनल बँकेला कोट्यवधींचा चुना लावून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दणका दिला आहे. हिंदुस्थानसह पाच देशांमधील मोदीची ज्वेलरी, बँक अकाऊंटसहित सुमारे 637 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मोदीच्या अडचणीत वाढ झाली आहे.

याआधी नीरव मोदीविरुद्ध इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यानंतर एका देशातून दुसऱ्या देशात पळून जाण्यावर निर्बंधही घातले गेले आहेत. सीबीआयाने इंटरपोलला केलेल्या विनंतीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे मोदीविरोधात कारवाईला आणखी वेग आला आहे.

ईडीने पाच देशांत जाऊन त्याची संपत्ती केली. हाँगकाँगमध्ये जप्त करण्यात आलेल्या संपत्तीत 22.69 कोटी रुपयांच्या हिरेजडीत दागिन्यांचाही समावेश आहे. तर दक्षिण मुंबईतील त्याचा 19.5 कोटींचा प्लॅटही जप्त करण्यात आला आहे. हा फ्लॅट पूर्वी मोदीच्या नावाने रजिस्टर असून 2017 मध्ये तो खरेदी करण्यात आला होता, अशी माहिती मिळते. तर सिंगापूरमध्ये देखील नीरव मोदीचे एक बँक खाते सिल करण्यात आले असून त्यात 44 कोटी रुपये असल्याचे कळते.