मंत्रिमंडळ विस्ताराचे फटाके दसऱ्यानंतरच फुटणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या अखेरच्या विस्ताराला अजून दिल्लीश्वरांनी हिरवा कंदील दाखविला नसल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा लांबणीवर पडणार आहे. विस्तारासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा उत्सुक असले तरी राष्ट्रीय संघटनमंत्री रामलाल यांच्यामार्फत नागपूरवरून मंत्रिमंडळ विस्तारासाठीचे सकारात्मक संकेत अजून न मिळाल्याने विस्तार लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. ‘प्रवासी भारतीय दिना’च्या कार्यक्रमानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसांपूर्वीच दिल्लीमुक्कामी होते. मात्र मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट होऊ न शकल्याने नवरात्रीच्या आसपास अपेक्षित असलेला मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी बोलून दाखवली.

मुख्यमंत्री फडणवीस हे खुद्द मंत्रिमंडळ विस्तारासाठी फारसे उत्सुक नाहीत, मात्र भाजप अध्यक्ष अमित शहा यांना त्यांचे निकटवर्तीय असलेले मुंबई विभागीय भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांना मंत्री करायचे आहे, मात्र फडणवीसांनी या ना त्या कारणाने मंत्रिमंडळ विस्तार टाळत शेलारांचे पंख व्यवस्थितरीत्या कापले आहेत. नुकतेच मुंबई दौऱयावर आलेल्या अमित शहा यांनी त्यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिले होते. मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यास मंत्रीपदाची संधी न मिळालेल्या नाराजांची संख्या वाढेल. त्याचा फटका निवडणुकीत बसू शकेल अशी भीती मुख्यमंत्र्यांना वाटत असल्याचे समजते, मात्र महाराष्ट्र भाजपमधील आपला गट मजबूत करण्यासाठी अमित शहा मुख्यमंत्र्यांवर मंत्रिमंडळ विस्तारासाठी दबाव आणत असल्याची चर्चाही भाजपच्या वर्तुळात आहे. अर्थात पंतप्रधान व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचेही लक्ष महाराष्ट्रातील घडामोडींकडे असल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार टाळण्यात मुख्यमंत्री आतापर्यंत तरी यशस्वी ठरले आहेत.

‘प्रवासी भारतीय दिना’निमित्त मुख्यमंत्री दिल्लीत होते, मात्र त्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याशी भेट होऊ शकली नाही. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याही भेटीची वेळ मुख्यमंत्र्यांनी मागितली होती, मात्र ही भेट मिळू शकली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी मध्यरात्री गुफ्तगू केल्याचे सूत्रांनी सांगितले.

केवळ दोन मंत्रीपदे आणि डझनभर इच्छुक
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपच्या कोटय़ातून मुंबई व विदर्भातील प्रत्येकी एक आमदाराला मंत्रीपद मिळणार असल्याचे समजते, मात्र मंत्रीपदासाठी भाजपमधील डझनभर आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले असताना केवळ दोनच मंत्रीपदे दिली तर पक्षात नाराजी उफाळून येणाची भीती मुख्यमंत्र्यांना वाटते. त्यामुळेच मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तारासाठी फारसा इंटरेस्ट दाखवत नसल्याचे समजते. मंत्रिमंडळ विस्तार झालाच तर मुंबईतून आशीष शेलार आणि विदर्भातून अनिल बोंडे किंवा दिवंगत पांडुरंग फुंडकर यांचे चिरंजीव आकाश फुंडकर यांची नावे आघाडीवर असल्याचे समजते. सध्या सुरू असलेला पितृपक्ष आणि त्यानंतर येणारा नवरात्रोत्सव या पार्श्वभूमीवर दसऱयानंतर किंवा दिवाळीच्या आसपास मंत्रिमंडळ विस्ताराचे फटाके फुटू शकतात अशीही एक शक्यता वर्तवली जात आहे.