सामना रंगणार… ‘माहिती अधिकार’ निर्णयाला ‘बीसीसीआय’ देणार आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

क्रिकेटच्या जगतातील गर्भश्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ओळख असलेल्या हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) केंद्रीय माहिती आयोगाने नुकताच माहिती अधिकार कायद्याच्या (आरटीआय) कक्षेत आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. मात्र यामुळे ‘बीसीसीआय’ जाम भडकली असून ते माहिती आयोगाच्या या निर्णयाला आव्हान देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येते आहे.

स्रर्वोच्च न्यायालयाने ‘बीसीसीआय’वर नेमलेल्या प्रशासकीय समितीच्या अधिकाऱयांनी या प्रकरणात दुर्लक्ष केल्यामुळे माहिती आयोगाने असा निकाल दिल्याचा आरोप ‘बीसीसीआय’च्या एका उच्चपदस्थ अधिकाऱयाने केला आहे.

‘बीसीसीआय’ने आम्ही स्वायत्त संस्था असल्याचे सांगत सातत्याने ‘आरटीआय’च्या कक्षेत येण्यास टाळाटाळ केली होती. मात्र केंद्रीय माहिती आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे ‘बीसीसीआय’च्या स्वायत्ततेला सुरुंग लागला असून त्यांना आता राष्ट्रीय क्रीडा महासंघाचा (एनएसएफ) भाग म्हणून काम करावे लागणार आहे. प्रशासकीय समितीने दुर्लक्ष केल्यामुळे बीसीसीआयला माहिती आयोगासमोर आपली बाजू मांडता आली नाही. त्यामुळे आम्ही माहिती आयोगाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचा पवित्रा ‘बीसीसीआय’ने घेतला आहे. माहिती आयोगाने वारंवार बीसीसीआयला नोटीस पाठवली, मात्र विनोद राय व डायना एडुल्जी यांच्या क्रिकेट प्रशासकीय समितीने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. त्यांनीच ‘बीसीसीआय’च्या निवडणुकीपूर्वी बोर्डाला ‘आरटीआय’च्या कक्षेत आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे केंद्रीय माहिती आयोगापुढे ‘बीसीसीआय’ला आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही. सध्या ‘बीसीसीआय’चे वकील माहिती आयोगाने दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करत आहेत. त्यानंतरच योग्य ते पाऊल उचलले जाईल, अशी माहितीही बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.