नांदुरमधमेश्वर पक्षी अभयारण्य गजबजणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । निफाड

नांदुरमधमेश्वर अभयारण्यात येत्या काही दिवसांत देशविदेशातील हजारो पक्ष्यांचे मधुर गुंजन सुरू पक्षीप्रेमींच्या कानांना हळुवार आनंद देणार आहे. सध्या भाद्रपद महिन्याच्या उन्हाचा चटका सहन करतानाच पहाटेचा गारवाही अनुभवायला येत असून थंडीचा मोसम उंबरठय़ावर असताना नांदुरमधमेश्वर पक्षी अभयारण्यात शनिवारी केलेल्या पक्षीगणनेत 20 हजार 691 विविध प्रजातीच्या पक्ष्यांची गणना करण्यात आली.

महाराष्ट्राचे भरतपूर आणि जागतिक पाणथळ स्थळ म्हणून नांदुरमधमेश्वरची ख्याती झाली आहे. दिवंगत पक्षीमित्र डॉ. सलीम अली यांच्या पुढाकाराने या ठिकाणी पक्षीसंमेलनासारखे कार्यक्रम घेतल्याने निसर्गप्रेमींना या स्थळाची माहिती झाली तेव्हापासून या ठिकाणी पक्षीमित्र व प्रेमींची पावले हिवाळय़ात आपोआपच वळतात. नांदूरमधमेश्वर या ठिकाणी दरवर्षी थंडीच्या दिवसात ऑक्टोबर ते जानेवारी या महिन्यांत देशविदेशातून हजारो स्थलांतरित पक्षी नांदूरमधमेश्वरच्या जलाशयावर मुक्त विहार करत असतात.

या ठिकाणी वन्यजीव विभाग, पक्षीमित्र व स्थानिक गाईड हे पक्षीगणना करत असतात. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत पक्षीगणना करण्यात आली. यावेळी विविध जातीचे 19,405 तर आजूबाजूच्या झाडावर व गवताळ क्षेत्रात 1286 असे एकूण 20,691 पक्षी आढळून आले आहेत. यावेळी सप्टेंबरच्या अखेरीसच इतक्या पक्ष्यांची दाटी आढळून आल्याने पक्षीमित्रांनी आनंद व्यक्त केला असून पक्षीजत्रेसाठी आम्ही सज्ज असल्याचे जाहीर केले.

पक्षीगणना करण्यासाठी सहाय्यक वन संरक्षक भगवान ढाकरे, वन परिमंडल अधिकारी अशोक काळे, वनरक्षक चंद्रमनी तांबे, अश्विनी पाटील, पक्षीमित्र दत्ता उगावकर, डॉ. उत्तम डेर्ले, आनंद बोरा, चंद्रकांत दुसाने, राहुल बेलेकर, राहुल वडघुले, गंगाधर आघाव, सुनील जाधव, गाईड अमोल दराडे, प्रमोद दराडे, शंकर लोखंडे, अमोल डोंगरे सहभागी झाले होते.

या वर्षी सप्टेंबरच्या अखेरीसच अनेक पक्षी नांदुरमधमेश्वरच्या पाणवठय़ावर दाखल झाले आहे. देशविदेशातील पक्ष्यांची मांदियाळी पाहण्यासाठी पर्यटक आणि पक्षीप्रेमी आतुर झाले आहेत. दरवर्षी इथे भेट देणाऱया पर्यटकांची संख्या वाढत आहे. या वर्षी अजून यात वाढ होईल आणि नांदुरमधमेश्वर पक्षी अभयारण्याचे नाव सर्वदूर पोहोचेल.                     z प्रवीण दौंड, पक्षीमित्र