
सामना प्रतिनिधी। अमित खोत
कोकण किनारपट्टीवर पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मालवणात नव्या पर्यटन हंगामाची सुरवात झाली आहे. सागरी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मालवणात कृषी, धार्मिक पर्यटनही वाढत आहे. नवी पर्यटन केंद्र पर्यटकांना खुणावत आहेत. तर काही पर्यटन ठिकाणांना नवी झळाळी मिळाली आहे. त्यापैकीच एक असलेल्या मालवण शहरातील रॉक गार्डन एलईडी ‘कलर फूट लाईट’ने झगमगून गेले आहे. कलर दिव्यांचा नजरा पाहण्यासाठी सायंकाळ नंतर पर्यटक व स्थानिकांची मोठी गर्दी होत आहे.
राज्यशासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून मालवण रॉक गार्डन येथे जिल्ह्यातील पहिला वहिला एलईडी कलर लाईट आणि हायमास्ट टॉवरचा प्रकल्प राबविण्यात आला आहे. सुमारे २ कोटी १० लाख रुपये निधीतून कलरफुल लाईट व हायमास्ट टॉवर जोडणी पूर्ण झाली आहे. अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली.
मालवण शहरासाठी राज्य शासनाने ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी वैशिष्ट्यपूर्ण योजना राबविण्यासाठी दिला होता. त्यातील १ कोटी २५ लाख खर्चातून मालवण शहरासाठी सुमारे २ हजार एलईडी दिवे बसविण्यात आले. उर्वरित २ कोटी २५ लाख निधीतून मालवण रॉक गार्डन बरोबरच चिवला बीच, बंदर जेटी, मोरयाचा धोंडा, याठिकाणी रंगीबेरंगी एलईडी दिवे व हायमास्ट टॉवर उभारले जाणार आहेत. तसेच शहरातील प्राचीन मंदिरामध्ये या एलईडी दिव्यांची आरास केली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे एलईडी दिवे बसविले आहेत. यातून पर्यटन विकासात भर पडणार आहे. तसेच मालवणचे पर्यटन अधिक उजळून निघाले आहे.
किनारपट्टी होणार कलरफुल
मालवण रॉक गार्डन येथे पायवाटा, खडक व झाडे यांच्यावर कलर लाईटचा प्रकाश पाडला जाणार आहे. चिवला बीच, बंदर जेटी येथेही अशाच लाईट दिल्या जाणार आहेत. आवश्यक त्याठिकाणी हायमास्ट टॉवरची उभारणी होणार आहे. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनी भारतीय तिरंग्याच्या रंगात रॉक गार्डन उजळून निघेल अशीही व्यवस्था या लाईट व्यवस्थेच्या माध्यमातून केली जाणार आहे. रात्रीच्या वेळी पर्यटकांना आनंद घेताना त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाणार आहे.
दिवाळी पूर्वी लोकार्पण
मालवण शहरात चिवला बीच समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या रॉक गार्डन येथे ३ हायमास्ट टॉवर, ३२५ कलर एलईडी फूट लाईट, ३० पोल लाईटची जोडणी करण्यात आली आहे. याठिकाणी बच्चे कंपनीसाठी सुमारे २५ लाखाची खेळणी जोडणी करण्यात येणार आहेत. लवकरच या सर्व प्रकल्पाचा लोकार्पण केला जाणार असल्याचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी सांगितले आहे.































































