
सामना ऑनलाईन । श्रीनगर
कश्मीरमधील दहशतवादावर भाष्य करत राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी दहशतवाद्यांना कठोर इशारा दिला आहे. गोळ्या चालवून तुम्ही पुष्पगुच्छाची अपेक्षा करू नका अशा शब्दांत त्यांनी दहशतवाद्यांना सुनावले आहे. आपण राज्यपालपद सांभाळ्यानंतर कश्मीर खोऱ्यात 40 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तसेच हिंसाचार आणि दगडफेकीच्या घटनाही कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.
कश्मीरमध्ये लश्करचा क्रूर दहशतवादी बांगरूचा खात्मा, एक जवान शहीद
दहशतवाद्यांचे आयुष्य लहान असते. ते गोळ्या चालवतील तर आपले जवान त्यांना चोख प्रत्युत्तर देतील. गोळ्या चालवून त्यांनी पुष्पगुच्छांची अपेक्षा करून नये. आपल्या कार्यकाळात 40 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आले आहे. दहशतवादाविरोधातील ही मोहीम अशीच सुरू राहील असे त्यांनी स्पष्ट केले. दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्याही कमी झाली आहे, असे ते म्हणाले. हिंसाचार आणि दगडफेकीच्या घटना कमी झाल्या असून राज्यातील परिस्थिती आता चिंताजनक नसल्याचे त्यांनी सांगितले. आपली माहिती आकडेवारी आणि राज्यातून घेतलेल्या आढाव्यातून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी युवा वर्गाकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. येथील तरूण केंद्र सरकार, स्थानिक नेते, फुटीरतावादी या सर्वांवर नाराज आहे. तरुणांमधील असंतोष दूर झाल्यास राज्यात प्रस्थापित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकार त्यांच्याविरोधात नसून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे, हा विश्वास त्यांना मिळायला हवा असे ते म्हणाले.
दहशतवादी तरुणांची माथी भडकावत असून सुशिक्षीत लोकही त्यांना बळी पडत आहे. त्यामुळे दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलण्याची वेळ आली आहे असे त्यांनी स्पष्ट केले.आम्ही दहशतवादाबरोबरच दहशतवाद्यांचे विचार संपवण्याचा प्रयत्न करत आहोत. दहशतवाद कोणत्याही शस्त्रांमध्ये नसून तो लोकांच्या मनात असतो, त्याला संपवण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. दहशतवादी तरुणांच्या मनात विष कालवत आहेत. मात्र, दहशतवादाने काहीही साध्य होणार नाही, हे तरुणांना पटवून देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

























































