
सामना प्रतिनिधी । लातूर
शहर महानगर पालिकेची रस्त्याची जागा बळकाऊन थेट विनापरवाना शॉपींग कॉम्प्लेक्स उभे करण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी संजीव भगवानराव कोकीळ यांनी लेखी तक्रार दाखल केली होती. जिल्हाधिकारी यांनी सुनावणी घेऊन अनाधिकृत शॉपींग कॉम्प्लेक्स पाडण्याचे आदेश महानगर पालिकेला दिले परंतू या आदेशाला महानगर पालिकेकडून केराची टोपली दाखवण्यात आल्याचे दिसून येत आहे.
१६ जून २०१७ रोजी संजीव भगवानराव कोकीळ यांनी जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. महानगर पालिकेची रस्त्याची जागा बळकाऊन अतिक्रमण केले आहे. संबंधित अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करुन द्यावा अशी मागणी केलेली होती. जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात सुनावणी घेतली आणि २९ ऑगस्ट २०१७ रोजी आदेश दिले. त्यामध्ये महानगर पालिकेच्या विकास योजनेनुसार सिटी सर्व्हे क्रमांक ४४६० च्या पुर्वेकडील ३० फुटाचा रस्ता अतिक्रमण काढून नागरिकांसाठी खुला करुन द्यावा. डॉ.खान यांचे पत्र्याचे शेड काढून टाकावे असे आदेश दिले होते.
२९ ऑगस्ट २०१७ रोजी जिल्हाधिकारी यांनी दिलेले आदेश महानगर पालिकेस प्राप्त झाले परंतू अतिक्रमण काढण्याची कारवाई मात्र जाणीवपुर्वक करण्यात आलेली नाही. तब्बल एक वर्षापेक्षाही अधिकचा काळ होऊनही जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचे काम महानगर पालिकेच्यावतीने करण्यात आलेले आहे.
महानगर पालिकेच्या वतीने या प्रकरणात केवळ कागद काळे करण्याचे काम करण्यात आलेले आहे.प्रत्यक्षात अतिक्रमण काही काढण्यात आलेले नाही. १७ फेब्रुवारी रोजी सहाय्यक संचालक नगर रचना लातूर शहर महानगर पालिका यांनी अतिक्रमण काढण्याचे आदेश अतिक्रमण प्रमुखास दिले परंतू त्यांची अंमलबजावणी झालेली नाही

































































