रुग्णाच्या वेदना जाणून घेण्यासाठी डॉक्टरने केली स्वतःवरच एंडोस्कोपी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नांदेड

एंडोस्कोपी करताना रुग्णाला काय वेदना होतात, हे जाणून घेण्यासाठी डॉ. नितीन जोशी यांनी स्वतःवरच एंडोस्कोपी करण्याचा अफलातून प्रयोग केला आहे. डॉ. जोशी यांनी कुणाचीही मदत न घेता 5 मिनिटे 12 सेकंदात स्वतःची एंडोस्कोपी केली. देशातील हा पहिलाच प्रयोग असून यापूर्वी जपान आणि कोरियामध्ये असे प्रयोग झाले आहेत.

डॉ. नितीन जोशी गेल्या दोन वर्षांपासून नांदेडच्या गॅलेक्सी रुग्णालयात गॅस्ट्रोएन्टोरोलॉजिस्ट म्हणून काम करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत सात हजारांपेक्षा अधिक रुग्णांची एंडोस्कोपी केली आहे. त्यातील बऱ्याच एंडोस्कोपी त्यांनी रुग्णांना भूल न देता केल्या आहेत. हे होत असताना रुग्णाला झालेल्या वेदना किती भयावह असतात, याचा अनुभव त्यांनी घेतला. त्यांच्या प्रयोगाला त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी विरोध केला होता, मात्र डॉ. जोशी यांनी त्यांचे ऐकले नाही.

सकाळी काहीही न खाता जोशी आपल्या गॅलेक्सी रुग्णालयात आले. केसपेपर तयार करून त्यांनी स्वतःच सह्या केल्या. त्यानंतर एन्डोस्कोपीला सुरुवात केली. सर्व बटणे स्वतःच ऑपरेट केली. सुरुवातीला त्यांना थोडा त्रास झाला, मात्र सर्व सुरळीत पार पडले. या पूर्ण प्रक्रियेसाठी 5 मिनिटे 12 सेकंद लागले. त्यांचे जठर चांगल्या स्थितीत असल्याचा अहवाल संगणकाने दिला.

एंडोस्कोपीच्या वेळी रुग्णांना वेगवेगळ्या त्रासांतून जावे लागते. जोपर्यंत स्वतः त्याचा अनुभव घेऊ शकत नाही, तोपर्यंत रुग्णांचा त्रास समजू शकत नाही. म्हणूनच मी स्वतःवर एंडोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला. एंडोस्कोपीत चिरफाड न करता शरीरातील भाग बघता येतात. त्यासाठी कॅमेरा लावून उपकरण तोंडावाटे शरीरात पाठवले जाते.
-डॉ. नितीन जोशी

summary- doctor did endoscopy on himself