
सामना प्रतिनिधी, मुंबई
परदेशी नागरिक, हायप्रोफाईल नशेबाज आणि सेलिब्रिटीजना ‘मनाली क्रिम’ या महागडय़ा चरसची विक्री करणारा सप्लायर अमली पदार्थविरोधी पथकाच्या हाती लागला आहे. मर्चंट नेव्हीमध्ये काम करणारा हा तस्कर सुट्टीवर घरी आल्यानंतर चरस विकायचा. त्याच्याकडून दीड लाखाचा चरस जप्त केला.
अमली पदार्थविरोधी पथकाचे उपायुक्त शिवदीप लांडे व वरळी युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुदर्शन चव्हाण, अमर म्रहाठे व पथक शनिवारी माहीमच्या कापड बाजार परिसरात गस्त घालत असताना तरुण संशयास्पदरित्या आढळल्याने पोलिसांनी नदीम रफिक मन्सुरी ऊर्फ गुड्डू (29) याला ताब्यात घेतले.
गुड्डू मर्चंट नेव्हीचा कर्मचारी
गुड्डू हा मर्चंट नेव्हीमध्ये कामाला आहे. सहा-सात महिने काम करून सुट्टीवर घरी आल्यानंतर तो ‘मनाली क्रिम’ चरस सप्लाय करण्याचे काम करतो. 2013 पासून तो हा धंदा करत असून परदेशी नागरिक, हायप्रोफाईल नशेबाज, सेलिब्रिटीजना ‘मनाली चरस’ उपलब्ध करून देण्याचे काम तो करतो. ‘मनाली क्रिम’ नावाने प्रसिद्ध असलेल्या चरसला बाजारात खूप मागणी असून ते महाग आहे. त्यामुळे गुड्डू मनाली चरस सप्लाय करायचे काम करतो असे सावंत म्हणाले.
summary- drug supplier got arrested
























































