कश्मीर खोर्‍यात बंदमुळे जनजीवन ठप्प, कुलगाम स्फोटातील 7 नागरिकांच्या मृत्यूविरोधात आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । श्रीनगर 

कश्मीर खोर्‍यातील कुलगाम जिह्यात काल दहशतवादी आणि सुरक्षा दलांतील चकमकीनंतर झालेल्या स्फोटात 6 नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्याच्या निषेधार्थ फुटीरतावादी हुर्रियतसह अनेक संघटनांनी आज कश्मीर बंदचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर संपूर्ण कश्मीर खोर्‍यात बंदमुळे जनजीवन पार ठप्प झाल्याचे चित्र दिसले. दुकाने, शाळा, महाविद्यालये, खासगी आस्थापने आणि व्यापारीपेठांनी कडकडीत बंद पाळला. बंदच्या दरम्यान हिंसाचार होऊ नये म्हणून जम्मू-कश्मीर पोलिसांनी कुलगाम आणि श्रीनगर जिह्यासह अनेक जिह्यांत संचारबंदी आणि जमावबंदी लागू केली होती.

फुटीरतावादी संघटनांच्या कश्मीर बंददरम्यान हिंसाचार घडू नये म्हणून सुरक्षा दलांनी श्रीनगरच्या खान्यार, रैनवाडी, नौहट्टा, मैसूमा, एम.आर.गंज और करालखुर्द या भागात अतिरिक्त तुकड्या तैनात केल्या होत्या. बंदच्या काळात रस्त्यावरील वाहतूकही पूर्ण बंद होती. सर्वत्र सन्नाटा पसरल्याने कश्मीर खोर्‍यातील सर्वच व्यवहार पार थंडावल्याचे जाणवत होते. त्यातच रेल्वे आणि इंटरनेट सेवाही बंद झाल्याने बंदचा परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवला.