मुळा धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नगर

उर्ध्‍व गोदावरी खोऱ्यातील धरण समुहातील जलाशयांमधील पाणी पैठण धरणासाठी मुळा धरणातून जायकवाडी धरणात एकूण 54 दलघमी (1.90 टीएमसी) पाणी तात्‍काळ सोडण्‍यात येणार आहे. मुळा धरणातून सुरुवातीला 2 हजार क्‍युसेक्‍स या वेगाने पाणी सांडव्‍याद्वारे मुळा नदीपात्रात सोडण्‍यात येणार आहे. नंतर प्रत्‍येक तासाला विसर्ग वाढविण्‍यात येणार आहे. तो 6 हजार क्‍युसेक्‍स या प्रमाणे मुळा नदीतून प्रवाहित होणार आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद यांच्‍याकडून उर्ध्‍व गोदावरी खोऱ्यातील धरण समुहातील जलाशयांमधील पाणी पैठण (जायकवाडी) धरणात सोडण्‍यासाठी आदेश देण्‍यात आले आहेत.

मुळा नदीतून 6 हजार क्‍युसेक्‍स या वेगाने पाणी प्रवाहित होणार असल्‍याने नदीतील पाणी उपसा करण्‍यासाठी बसविलेली इंजिन, मोटार व इतर सर्वप्रकारचे चीज, वस्‍तू, साहित्‍य, तात्‍काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्‍यात यावे. प्रवाहामुळे या साहित्‍याचे नुकसान झाल्‍यास जलसंपदा खाते जबाबदार राहणार नाही. मुळा नदीतील विसर्ग जादा दराने असल्‍याने प्रवाहात उतरण्‍याचा कोणीही प्रयत्‍न करु नये अन्‍यथा जिवितहानी होवू शकते. तमाम नागरिकांनी दक्षता घ्‍यावी.प्रवाहामुळे जीवीत,वित्‍त हानी झाल्‍यास जलसंपदा खाते जबाबदार राहणार नाही, असे सांगण्यात आले आहे.

मुळा नदीतून वाहणाऱ्या पाण्‍यास अडथळा निर्माण होईल असे कोणतेही कृत्‍य करु नये. तसेच पाण्‍याचा कोणत्‍याही प्रकारे उपसा करु नये, तसे केल्‍याचे आढळल्‍यास अथवा करण्‍याचा प्रयत्‍न केल्‍यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. मुळास नदीत सोडलेले पाणी विना अडथळा जास्‍तीत जास्‍त प्रमाणात जायकवाडी धरणात पोहोचेल यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्‍याचे जाहीर आवाहन नगर मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. पी. मोरे यांनी एका प्रसिध्‍दीपत्रकाद्वारे केले आहे.