पीएचडी स्कॉलर दहशतवाद्यासह दोघांचा चकमकीत खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

कश्मीर खोऱयातील अनंतनाग जिह्यातील नौगाम भागात लष्करी सुरक्षा दलांनी बुधवारी हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांचा चकमकीत खात्मा केला. या चकमकीत ठार झालेला सबझार अहमद सोफी हा युवा दहशतवादी एम. फिल पदवीधारक असल्याचे उघड झाले आहे. नवी दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातून सोफीने वनस्पतीशास्त्रात (बॉटनी) पीएचडी केली होती. उच्च शिक्षणानंतर तो हिजबुल या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचे समजते. आजच्या चकमकीत सोफीसोबत असिफ अहमद हा त्याचा सहकारी अतिरेकीही ठार झाला.

गेल्या काही वर्षांत कश्मीरच्या स्वातंत्र्याच्या वेडातून अनेक उच्चशिक्षित युवक दहशतवादी संघटनांच्या गळाला लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 33 वर्षीय सबझार सोफी याने बॉटनीत एमएस्सी करीत बीएड डिग्रीही मिळवली होती. या वर्षभरात दहशतवादी कारवाईत सामील होऊन ठार झालेला सोफी हा तिसरा उच्चशिक्षित दहशतवादी ठरला आहे. याआधी अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा स्कॉलर मन्नान वाणी हा कुपवाडातील तर कश्मीर विद्यापीठाचा सहायक प्राध्यापक मोहम्मद रफी भट शोपियाँ जिह्यातील सुरक्षा दलाविरोधातील चकमकीत ठार झाले आहेत.