
सामना प्रतिनिधी । मुंबई
बहिणाबाईंच्या देखण्या शब्दकलेला नृत्यसंगीताचा साज चढविण्यात आलाय. बहिणाबाईंची गाणी म्हणजे खान्देशी वऱहाडी बोलीतलं महाकाव्यच. स्वतः निरक्षर असूनही त्यांनी लिहिलेल्या देखण्या आणि सरस कविता… आयुष्यात येणाऱया सर्व चांगल्या-वाईट क्षणांना धीटपणे सामोऱया गेलेल्या बहिणाबाईंनी आपल्या जीवनातील अनुभवांना कवितेतल्या शब्दांतून व्यक्त केलं. शाळकरी वयातच त्यांना गाणी सहज सुचायची. अशी दैवी प्रतिभेची देणगी लाभलेल्या या कवयित्रीचा जीवनपट रसिकांसमोर काव्य-नृत्य आणि नाटय़ाद्वारे ‘माझी माय सरसोती’ या संगीतमय कलाकृतीद्वारे मांडला जाणार आहे.
सॉनिक ऑक्टेव्हज् प्रस्तुत जीवनकला आणि अनामिका निर्मित या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग दीनानाथ नाटय़गृहात आज दुपारी 4 वाजता सादर होतोय. या म्युझिकल कलाकृतीचे लेखन अनुराधा गानू यांनी केले आहेत. तसेच काही गीतेही लिहिली आहेत.
या कायक्रमाविषयी संगीतकार मिलिंद जोशी सांगतात, बहिणाबाईंची गाणी संगीतबद्ध करायला मिळणं ही एक पर्वणीच होती. ती आजच्या संगीत प्रकारात गायला हवीत. आधुनिक प्रकारच्या संगीत प्रकारात बहिणाबाई गायला हव्यात. मराठी रंगमंचावर म्युझिकलच्या रूपात त्यांचं सादरीकरण करण्याची संधी मिळतेय याचा आनंद होतोय.
अनोखा सांगीतिक बाज…
बहिणाबाईंच्या काव्यावर आधारित या नाटकातील गाणी एका वेगळ्याच सांगीतिक बाजात बांधली आहेत. माझी माय सरसोती, अरे खोप्यामधी खोपा, अरे संसार संसार, धरित्रीच्या कुशीमध्ये, मन वढाळ वढाळ, बिना कपाशीचे उले… अशा गावरान भाषेतील कवितांमधून बहिणाबाई बरेच काही सांगून गेल्या. जगण्यातील वेदना, संकटांवर मात करण्याचं तत्त्वज्ञान शिकवणाऱया या कवितांद्वारे त्यांचा जीवनपट नृत्य आणि नाटय़ाच्या माध्यमातून पाहण्याची संधी या कलाकृतीद्वारे प्रेक्षकांना मिळणार आहे.




























































