
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
सकस आहार म्हणजे वरण, भात, भाजी, पोळी आणि तत्सम पदार्थ. त्यातही वरण, आमटी भात म्हणजे हिंदुस्थानीं नागरिकांच्या जेवणातला अविभाज्य घटक. यामुळे मूग आणि मसूर डाळीला हिंदुस्थानींची विशेष पसंती. पण या डाळी आपल्या शरीरासाठी अपायकारक असून त्या खाल्ल्याने कॅन्सरसारखा दुर्धर आजार होऊ शकतो. असे भारतीय अन्न व सुरक्षा मानांकन प्रशासनाने (FSSAI) केलेल्या चाचणीत समोर आले आहे. यामुळे नागरिकांनी या डाळी खाणे तात्काळ थांबवावे असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.

हिंदुस्थानमध्ये कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या बड्या देशांमधून मोठ्या प्रमाणावर मूग आणि मसूर डाळ आयात केली जाते. पण संशोधनात मात्र याच डाळींमध्ये विषारी घटक आढळल्याचे भारतीय अन्न व सुरक्षा मानांकन प्रशासनाने म्हटले आहे. नुकतीच प्रयोग शाळेत या डाळींच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यात या डाळींमध्ये हर्बीसाईड ग्लायफोसेट (herbicide Glyphosate) नावाचे विषारी रसायन आढळले. यामुळे कॅनडामध्ये या डाळींमध्ये हर्बीसाईड ग्लायफोसेटचे (herbicide Glyphosate) नेमके प्रमाण किती असते याबद्दल आवश्यक ती माहिती मिळवण्याच्या सूचना FSSAI ने अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. एवढेच नाही तर कॅनडाच्या अन्न प्रशासन विभागानेही (CFIA) कॅनडा व ऑस्ट्रेलियातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या मूग व मसूर डाळीचें नमुने तपासले. त्यातही डाळींमध्ये मोठया प्रमाणावर हर्बीसाईड ग्लायफोसेटचे प्रमाण असल्याचे अधिकाऱ्यांना आढळले. त्यानंतर एका सामाजिक कार्यकर्त्याने हिंदुस्थानमध्ये मिळणाऱ्या डाळींच्या दर्जावर चिंता व्यक्त करत हिंदुस्थानी आहारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. येथील लोकांना डाळींमध्ये हर्बीसाईड ग्लायफोसेट आहे हे देखील माहीत नसते असेही त्याने म्हटले होते. काही वर्षांपूर्वी हर्बीसाईड ग्लायफोसेट हे सुरक्षित रसायन असल्याचे मानले जात होते.
पण जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) विषारी रसायन असलेले हर्बीसाईड ग्लायफोसेट शरीरास अपायकारक असल्याने ज्या डाळींमध्ये त्याचा वापर केला जातो त्या डाळी खाणे तात्काळ थांबवा असे पत्रकच जारी केले आहे. या रसायनाचा वापर शेवाळ, तृण यांचा नाश करण्यासाठी केला जातो. हे रसायन शरीरात गेल्यावर रोगप्रतिकारकशक्ती कमी होते, किडनी फेल होते, व्हिटामिन्स, मिनरल्स आणि इतर पोषक तत्व शरीरात मिसळण्याची प्रक्रीया खुंटते. यामुळे डाळी आहारातून हद्दपार करण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने नागरिकांना केले आहे.

























































