हाऊसफुल-4: अक्षय कुमारच्या सल्ल्यामुळे तक्रार करण्याची ताकद आली, पीडित डान्सरची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

हाऊसफुल्ल – 4 या चित्रपटाच्या शूटींगच्यावेळी एका तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री घडला. त्यावेळी सेटवर अक्षय कुमारही होता. त्यानेच पीडित तरुणीला धीर देत तिला पोलिसात जायचा सल्ला दिला. तरुणीने स्वत: प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.

हाऊसफुल्ल चित्रपटातील अभिनेते नाना पाटेकर आणि दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर अक्षय कुमारने काही दिवस चित्रपटाचे शूटींग थांबविण्यास सांगितले होते. दरम्यान नाना आणि साजिद यांनी चित्रपटातून काढता पाय घेतल्यानंतर या चित्रपटाच्या शूटींगला पुन्हा सुरुवात झाली. गुरुवारी चित्रकूट स्टुडीओत चित्रपटाचे शूटींग सुरू असताना पवन हा ज्युनिअर आर्टीस्ट सेटवर आला व त्याने तेथील एका महिला डान्सरची छेड काढली.

‘आमचा सीन शूट झाल्यानंतर चहासाठी आम्हाला ब्रेक देण्यात आला होता. त्यावेळी आमचा सहकलाकार आमीर आमच्यासोबत बसला होता. त्यावेळी आमचा एक माजी सहकलाकार पवन त्याच्या सहा मित्रांसोबत तेथे आला व त्याने आमीरला खेचत बाहेर न्यायचा प्रयत्न केला. त्यावेळी मी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी त्याने माझ्याकडे मोर्चा वळवला व मागून मला उचलले. त्यानंतर त्याने मला चुकीच्या ठिकाणी स्पर्शही केला. मी किंचाळत होते पण तो माझी छेड काढतच होता. त्यानंतर इतर क्रु मेंबर व अक्षय, रितेशही तेथे आले. सगळे आल्यावर पवन व त्याच्या मित्रांनी तिथून पळ काढला. त्यानंतर अक्षयने मला पोलिसात जाऊन तक्रार देण्याचा सल्ला दिला’, असे पीडित तरुणीने प्रसारमाध्यमांना सांगितला.