
नीलेश कुलकर्णी । नवी दिल्ली
जगभरातील कोटय़वधी हिंदूंच्या आस्थेचे आणि अस्मितेचे प्रतीक असलेल्या अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेला ‘चलो अयोध्या’ नारा राममंदिर निर्माणाच्या पवित्र उपक्रमाला बळ देणाराच ठरेल, अशा शब्दांत हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे. शिवसेना पक्षप्रमुखांच्या 25 नोव्हेंबरच्या अयोध्या दौऱयाबाबत सर्वांनाच कमालीची उत्सुकता लागल्याचे चित्र राजधानी दिल्ली आणि उत्तर प्रदेशात दिसत आहे. अयोध्येतील राममंदिर उभारणीसाठी पुढाकार घेणाऱया विश्व हिंदू परिषदेच्या आजी-माजी अध्यक्षांनी शिवसेनेच्या ‘चलो अयोध्या’ मोहिमेचे स्वागत केले आहे.
शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुखांनी मंदिरनिर्माणाचा नारा दिल्यानंतर देशभरातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेनेच्या या घोषणेचे राष्ट्रीय राजकारणात जबरदस्त पडसाद उमटत असून उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा राजकीय वर्तुळासह मीडियातही औत्सुक्याचा विषय बनला आहे. हिंदुत्वासाठी काम करणाऱया संघटनांमध्येही उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱयाबाबत उत्सुकता असून सर्वत्र सध्या या दौऱयाबाबतच चर्चा झडत आहेत.
राममंदिरासाठी पुढाकार घेणाऱया सर्वांचेच स्वागत – विष्णू कोकजे
अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या भव्य मंदिराचे निर्माण व्हावे ही तमाम हिंदूंची भावना आहे. राममंदिरासाठी जो कोणी पुढाकार घेईल त्या सर्वांचेच आम्ही स्वागत करू. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राममंदिर उभारणीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहोत. ते स्वतः अयोध्येत येऊन मंदिराच्या उभारणीत योगदान देणार असतील तर त्याहून मोठी आनंदाची गोष्ट कोणती असेल, अशा शब्दांत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कोकजे यांनी शिवसेनेच्या ‘चलो अयोध्या’ मोहिमेचे स्वागत केले आहे.
हिंदुत्वाचा वारसा उद्धव ठाकरे खऱ्या अर्थाने पुढे नेत आहेत – प्रवीण तोगडिया
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्या दृष्टीने एकमेव ‘हिंदुहृदयसम्राट’ आहेत. ते आज हयात असते तर त्यांनीही राममंदिरासाठी ‘मिशन अयोध्या’सारखे पाऊल उचलले असते. देशभरातील हिंदूंच्या भावना लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी एक धाडसी पाऊल उचलले आहे. शिवसेनाप्रमुखांचा हिंदुत्वाचा वारसा ते खऱया अर्थाने पुढे नेत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्येतील आगमनाची आम्ही मोठय़ा उत्सुकतेने प्रतीक्षा करीत आहोत, अशी प्रतिक्रिया विहिंपचे माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय जनता पार्टीचे प्रमुख डॉ. प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केली.



























































