
>> अभय मोकाशी
जगभर सेल्फीमुळे अनेकांचे जीव गेले आहेत आणि यात हिंदुस्थानचा पहिला क्रमांक आहे. कार्नेगी मेल्लोन युनिव्हर्सिटी आणि इंद्रप्रस्थ इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, दिल्ली या दोन संस्थांनी 2016मध्ये सेल्फीसंबंधी केलेल्या संशोधनात असे दिसून आले की जगभरात 2014 मध्ये सेल्फी घेताना झालेल्या 213 मृत्यूंमध्ये आपल्या देशात 128 मृत्यू झाले होते. हे संशोधन ‘मी, मायसेल्फ अॅण्ड माय किल्फी’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आले होते. या विषयात आपला पहिला नंबर लागला हे कौतुकास्पद नाही. अनेकदा सेल्फी काढणाऱयांमध्ये चढाओढ दिसून येते. दुसऱयापेक्षा आपण काहीतरी वेगळं करावं या उद्देशाने सेल्फीवेडे विविध प्रकारचे धाडस करायला जातात, त्यात रेल्वेच्या गाडीतून लोंबकळणे, इमारतीच्या छतावर उभे राहणे, बोटीवर अगदी कडेला उभे राहणे असे प्रकार घडतात.
जगात एक नवीन ‘रोग’ सध्या आहे. योग्य काळजी न घेतल्यास या रोगाने सर्वनाश होऊ शकतो. या रोगाचा अभ्यास करणाऱया सामाजिक शास्त्र्ाज्ञांच्या 2017 साली प्रकाशित झालेल्या पाहणीनुसार या रोगाचे सर्वात जास्त बळी हिंदुस्थानात झाले आहेत. हा रोग साधारणतः फक्त स्वतःवर अपार प्रेम करणाऱया आणि सेलफोन असलेल्या व्यक्तींना होतो. दोन वर्षांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील हा रोग झाला होता, पण ते सध्यातरी त्या रोगापासून मुक्त झालेले दिसतात.
या रोगाला अजून नाव देण्यात आले नसले तरी याला सेल्फीटीस आणि जेव्हा त्यामुळे मृत्यू होतो तेव्हा त्याला किल्फी म्हणतात. सेल्फिटीस हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे आणि त्याची सुरुवात मोबाईल फोनमध्ये पुढचा कॅमेरा आला तेव्हापासून झाली. या कॅमेऱयामुळे सेलफोन वापरणारे स्वतःचाच फोटो काढू शकू लागले. स्वतःचा, म्हणजे इंग्रजी शब्द ‘सेल्फ’चा फोटो काढता येतो म्हणून अशा फोटोला सेल्फी म्हणतात आणि हा शब्द ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये 2013 साली समाविष्ट करण्यात आला आणि त्या शब्दाला मान्यता मिळाली.
फोटोग्राफीचा शोध लागल्यापासूनच लोकांना आपले फोटो काढून घ्यायला आवडू लागले. मोबाईल फोनमध्ये कॅमेरा आला आणि चित्र बदलू लागले. सेल फोन असलेल्या व्यक्ती फोटो काढू लागल्या. याच सुमारास समाज माध्यमांचा विकास होऊ लगला आणि अनेक जण आपण काढलेले फोटो या समाज माध्यमांवर टाकू लागले. त्यावर मिळणाऱया प्रतिक्रिया आपली लोकप्रियता दाखविते असे या मंडळीना वाटू लागले.
मात्र, सेल फोनच्या मागे कॅमेरा असल्याने स्वतःचाच फोटो काढणे इतकेसे सोपे नव्हते आणि अनेकदा संपूर्ण चेहरा अथवा संपूर्ण शरीर फोटोत येत नसे, कारण कॅमेरात काय टिपले जात आहे हे त्या व्यक्तीला दिसत नसे. मोबाईल फोनमध्ये पुढचा कॅमेरा आला आणि स्वतःचा फोटो काढणे सोपे झाले. आपण काढलेले इतरांचे किंवा प्रेक्षणीय स्थळांचे फोटो समाज माध्यमांवर टाकण्याबरोबर लोक आपले स्वतःचेच फोटो टाकू लागले. आपण काढलेल्या फोटोपेक्षा आपल्या चेहऱयाला चांगली प्रतिक्रिया मिळते का हे काही लोकांना महत्त्वाचे वाटू लागले.
मानसोपचारतज्ञांच्या मते अनेकदा न्यूनगंड असलेल्या व्यक्ती इतरांकडून कौतुकाची अपेक्षा करत असतात आणि अशी काही माणसे वेळोवेळी आपले फोटो समाज माध्यमांवर टाकत राहतात आणि ओळखीच्या तसेच अनोळखी व्यक्तींकडून कौतुकाची अपेक्षा करत असतात. बघता बघता काही मंडळी याच्या आहारी जातात.
सेल्फीची चटक लागलेल्या अनेक व्यक्ती सेल्फी काढताना सुरक्षिततेचे भान विसरतात कारण त्यांचे लक्ष फक्त त्या सेल्फीत असते. दसऱयाला अमृतसर येथे रावण दहन पाहताना 61 जणांचा रेल्वेच्या गाडीखाली चिरडून मृत्यू झाला कारण ही सर्व मंडळी रेल्वेच्या रुळांवर उभी होती. सर्वांना रावण जळताना पाहायचा होताच, पण त्याचबरोबर अनेकांना त्या जळणाऱया रावणाचे चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये करायचे होते आणि कदाचित ते समाज माध्यमांवर टाकायचे होते. अशा परिस्थितीत हे लोक तो रावण बघण्यात आणि ते क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱयाने टिपण्यात इतके मग्न होते की त्यांना आपल्या सुरक्षिततेचे भान राहिले नाही आणि अनेकांनी आपले जीव गमावले.
एकसारखे सेल्फी काढणे आणि समाज माध्यमांवर टाकणे हा एक प्रकारचा मानसिक आजार असो अथवा नसो, याची नशा लागलेल्या व्यक्तींनी आपल्या आणि इतरांच्या जीवाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
धाडसी सेल्फी काढण्यात रशिया फार पुढे आहे. याचे एक उदाहरण म्हणजे फेब्रुवारी 2017मध्ये रशियन मॉडेल विविका ओदिन्तकोवा हिने दुबईतील एका उंच इमारतीच्या छतावरून आपल्या सहकाऱयाच्या हाताने जमिनी पासून 1000 फुटावर स्वतःला लटकविले. जर तिच्या सहकाऱयाचा हात सुटला असता तर तिचा मृत्यू निश्चित होता. तिचे हे धाडस पाहून अनेकांना नको ती स्फूर्ती येऊ शकते. भारतीय जनता पक्षाच्या काही मंडळींनी तर दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थींबरोबरदेखील सेल्फी काढले.
उच्च पदांवर बसलेल्यांनी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींनी तरी जबाबदारीने वागले पाहिजे. कारण त्यांचे अनुकरण करणारे अनेक असतात. सेल्फी काढणे वाईट नाही, पण त्याचे व्यसन लागणे वाईट आहे. तसेच ते काढताना आजूबाजूचे भान न राहाणे धोक्याचे असू शकते.
सेल्फी काढताना मुंबईतदेखील काही मृत्यू झाले, त्या नंतर मुंबई पोलिसांनी ट्विटरवर मजकूर टाकला की सेल्फी काढणे म्हणजे स्वतःचा जीव घेणे असे होऊ देऊ नका.
अमेरिकेत नागरिकांना जंगली अस्वलांबरोबर सेल्फी काढायला आवडायचे, पण त्यात अनेकांचे जीव गेले तेव्हा तेथेदेखील अशाच प्रकारची सूचना देण्यात आली.
सेल्फीमुळे इतके जीव गेले हे लक्षात घेता इतकेच म्हटले पाहिजे की सेल्फी घेणाऱया प्रत्येकाने तो जीवावर बेतणार नाही याची काळजी घ्यावी.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)





























































