
सामना प्रतिनिधी । ठाणे
आरटीआय कायद्याचा ‘हत्यार’ करून हिरानंदानी बिल्डरसह अन्य बांधकाम व्यावसायिकांकडे पाच लाखांची खंडणी मागणारा भाजपचा ठाण्यातील पदाधिकारी व माजी नगरसेवक सुधीर बर्गेला पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. खंडणीविरोधी पथकाने आज बर्गेच्या मुसक्या आवळल्याने भाजपच्या नेत्यांची चांगलीच नाचक्की झाली आहे.
ठाणे शहरात गृहप्रकल्प, मॉल्स तसेच इतर बांधकामे मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. त्याचाच फायदा उपटत सुधीर बर्गे बांधकाम व्यावसायिकांना धमक्या देत होता. यासाठी तो आरटीआयद्वारे माहिती मागवून लाखो रुपयांच्या खंडण्या उकळायचा. वेळ पडली तर सत्तेचाही दुरुपयोग करायचा. हिरानंदानी कंपनीचे घोडबंदर रोडवर ‘हिरानंदानी मेडोज’ व ‘वन हिरानंदानी पार्क’ हे मोठे प्रोजेक्ट सुरू असून बिल्डरने बांधकाम करताना सर्व्हिस रोडची जागा हडप केल्याचा आरोप बर्गे यांनी केला होता. इतकेच नाही तर याविरोधात कायदेशीर कारवाईपासून सुटका हवी असेल तर 50 लाख रुपये द्या, असे कंपनीचे संचालक निरंजन हिरानंदानी यांना धमकावले होते.
तुला बघून घेईन…
बर्गे यांच्या गुंडगिरीला घाबरून निरंजन हिरानंदानी यांनी पाच लाख रुपयांची खंडणी देण्यास मान्य केले. त्यामुळे संतापलेल्या बर्गे याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली. इतकेच नाही तर पाच लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावत ‘तुला बघून घेऊन’ अशी धमकी दिली. दरम्यान हिरानंदानी बिल्डर बरोबरच मुंब्रा भागातील माँ मुंब्रा देवी या कंपनीच्या मालकालाही बर्गे याने पाच लाखांच्या खंडणीसाठी मारहाण केल्याची तक्रार दाखल झाली. या दोन्ही प्रकरणांत ठाणे खंडणीविरोधी पथकाने त्याला बेडय़ा ठोकल्या आहेत.




























































