माहीमच्या कंदील गल्लीतील आकाशकंदिलांना मोठी मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

प्रकाशाचा उत्सव असलेला दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. जीवनातील अंधार दूर करत जीवन प्रकाशमय करण्यासाठी घरोघरी कंदील लावले जातात. कंदिलाची खरेदी म्हटलं की मुंबईकरांची पावले वळतात ती माहीमच्या कंदील गल्लीत. सध्या येथील कुटुंबे कंदिलांची ऑर्डर पूर्ण करण्यात मग्न दिसत आहेत.

दिवाळीत फराळ, कपडे आणि फटाक्यांच्या खरेदीप्रमाणे कंदील खरेदीलाही प्राधान्य दिले जाते. गेल्या चार दशकांहून अधिक काळ माहीमच्या कंदील गल्लीतील घराघरात कंदील बनवण्याचा व्यवसाय सुरू आहे. येथे राहणारे जगन्नाथ जोगल गेल्या 42 वर्षांपासून कंदील बनवतात. दसऱयापासून त्यांचे संपूर्ण कुटुंब कंदील बनवण्यात मग्न आहे. याबाबत ते म्हणाले, दरवर्षी दिवाळीनिमित्त आम्ही 500 ते 600 कंदील बनवतो.

आमचे संपूर्ण कुटुंबीय या काळात वेळेत ऑर्डर पूर्ण करण्यात मग्न असते. दसऱयापासून आमच्या कामाला सुरुवात होते. अगदी 18 इंचापासून ते 15 फुटांपर्यंत आम्ही पारंपरिक आकाशकंदील बनवतो. चायनामेड कंदिलांच्या गर्दीतही पारंपरिक आकाशकंदिलांची डिमांड तसूभरही कमी झालेली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

कॉर्पोरेट कंपन्या, राजकीय पक्षांकडूनही मागणी
येथील व्यावसायिकांना केवळ घरगुती नाही तर कॉर्पोरेट कंपन्या, गृहनिर्माण सोसायटी आणि राजकीय पक्षांकडूनही कंदिलांची ऑर्डर मिळत आहे. ऑर्डरनुसार अगदी कंपनीचे किंवा पक्षाचे नाव, लोगो कंदिलावर छापले जातात. एक हजारापासून ते 20 ते 25 हजारांपर्यंत या कंदिलांची किंमत आहे.

summary- demand raise for lanterns  for diwali