नापिकी, कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
farmer

सामना प्रतिनिधी । लातूर

हासेगाववाडी (ता. औसा) येथील एका शेतकऱयाने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आज स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. चंद्रकांत नागोराव साठे असे या शेतकऱयाचे नाव आहे.

चंद्रकांत साठे (44) यांची सारोळा (ता. औसा) शिवारात शेती आहे. त्यांच्या तीन एकर शेतात सोयाबीनचा पेरा घेतला, पण त्यावर गोगलगायीचा रोग पडल्याने उत्पन्न घटले. या वर्षी पावसानेही दगा दिल्याने जेमतेम पाण्यावर सोयाबीनची लागवड केली होती.

शेतकरी साठे यांनी शेतीसाठी औसा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेकडून दीड लाख आणि अन्य वित्तसंस्थेकडून 2 लाख 50 हजार असे कर्ज घेतले होते तसेच खासगी हात उसनवारी केलेली होती, मात्र सततच्या नापिकीने शेतातून उत्पन्न मिळाले नाही. परिणामी कर्जाचा बोझा वाढत गेला. या वर्षी थोडेफार उत्पन्न मिळण्याची आशा होती, पण पावसाअभावी ती मावळली. यातूनच नैराश्य आल्याने चंद्रकांत साठे यांनी आज रविवारी सकाळी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.

चंद्रकांत साठे यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा-मुलगी असा परिवार आहे. आत्महत्येची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.