
सामना ऑनलाईन, मुंबई
बहरीन व अन्य आखाती देशांत आमची हॉटेल्स आहेत. तेथे किचनमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देऊ, असे आमिष दाखवून तरुणींना परदेशात नेल्यानंतर तेथे त्यांना वेश्याव्यवसाय करायला लावणाऱ्या तिघा मानवी तस्करांच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. या तिघा गुन्हेगारांनी त्यांच्या अन्य साथीदारांच्या मदतीने गेल्या दीड वर्षापासून 30 हून अधिक तरुणींना नोकरीचे आमिष दाखवत वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे.
फरीदउल हक शाह ऊर्फ टिपू (53), मोहम्मद कलाम अन्वर शेख (56), टिंकू दिनेश राज (36) या तिघांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने पकडले आहे. यातील टिपू हा आरोपींचा म्होरक्या असून तो बहरीनमध्ये तीन हॉटेल चालवतो. तर अन्य दोघे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणींना शोधून त्यांना टिपूकडे आणायचे काम करतात. या भामटय़ांनी बहरीनच्या हॉटेलात किचनमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. महिना 50 हजार पगाराची नोकरी मिळत असल्याने ती तरुणी देखील बहरीनला जाण्यास तयार झाली. त्यानुसार आरोपींनी तरुणीसोबत तीन महिन्यांचे करारपत्र बनवून घेतले. तिला सुरुवातीला 25 हजार दिले. त्यामुळे तरुणीचा त्यांच्यावर आणखी विश्वास बसला. त्यानंतर तरुणीला बहरीनला नेल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस तिला किचनमध्ये काम करण्यास दिले. मग मात्र तिला जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. तिने नकार देत हिंदुस्थानात जाण्याचा तगादा लावल्यावर आरोपीने तिचा पासपोर्ट काढून घेतला व पासपोर्ट हवा असेल तर दोन लाख दे अशी खंडणी मागितली. त्यानंतर कसेबसे करून तरुणीने मुंबई गाठली व नागपाडा पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दिली.
खंडणीविरोधी पथकाने कंबरडे मोडले
गुन्हा दाखल होताच उपायुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक अजय सावंत, सचिन कदम, अरविंद पवार व पथकाने गुह्याचा समांतर तपास सुरू केला. या पथकाने आधी मोहम्मद कलाम अन्वर शेख (56), टिंकू दिनेश राज (36) या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी गुह्याची कबुली दिली. मग पोलिसांनी यांचा म्होरक्या फरीदउल हक शाह ऊर्फ टिपू (53) याला उचलले. तेव्हा टिपूने त्याच्या अन्य साथीदारांसह आतापर्यंत किती तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून बहरीनमध्ये वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले याचा पाढा वाचला.
टिपूची बहरीनमध्ये तीन हॉटेल
तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून परदेशात नेणारा व तेथे त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास लावणारा टिपू हा मुंबईतल्या अंधेरी येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्ससारख्या उच्चभ्रू परिसरात राहतो. तो स्वतः छाप पाडण्यासाठी मर्सिडिजमधून फिरतो. बहरीनमध्ये त्याने कॅलिफोर्निया, डोनेट आणि मिडल ईस्ट अशी तीन हॉटेल चालवायला घेतली आहेत. आरोपी तीन महिन्यांचा करार करून तीन महिन्यांच्या व्हिसावर तरुणींना बेहरीनमध्ये नेतात.


























































