
सामना ऑनलाईन । उल्हासनगर
सध्या ऑनलाईन विक्री करणाऱ्या साईट्स चांगल्याच फोफावल्या आहेत. एकाच ठिकाणी बसून करता येणारं शॉपिंग, त्यात मिळणारे विविध पर्याय, विक्रेत्याकडून देण्यात येणारी सूट आणि तुलनेने बऱ्याच कमी किमतीला मिळणारी दर्जेदार वस्तू यांमुळे ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय निवडला जातो. पण, यामुळे दुकानदारांना मात्र तोटा सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून उल्हासनगरच्या दुकानदारांनी फेक ऑर्डरची नामी शक्कल शोधून काढली आहे.
अर्थात ही शक्कल काही नवीन नाही. पण, इ-कॉमर्स क्षेत्रापासून होणारं नुकसान टाळण्यासाठी प्रथमच याचा वापर केला जाणार आहे. ऑनलाईन विक्रेते देशाच्या निरनिराळ्या भागात ऑर्डरची डिलिव्हरी करतात. पण, जर एखाद्या भागातून त्यांचा माल मोठ्या प्रमाणावर परत आला, तर विक्रेती वेबसाईट तो भाग ब्लॉक करतात. हीच क्लृप्ती आता उल्हासनगर येथील व्यापाऱ्यांनी वापरायचं ठरवलं आहे. फेक ऑर्डर करून माल परत पाठवायचा जेणेकरून कंपन्या उल्हासनगरला ब्लॉक करतील.
उल्हासनगरच्या व्यापारी संघटनेने सोमवारी यासंबंधी एक बैठक बोलावली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या ऑनलाईन शॉपिंगमुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर उल्हासनगरचे व्यापारी आणि दुकानदार मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करत आहेत. सरकारचंही या वेबसाईट्सवर कोणतंही बंधन नाही. त्यामुळे जास्तीत जास्त सूट देऊन त्या ग्राहकांना आकर्षित करतात आणि त्याचा तोटा दुकानदारांना सहन करावा लागतो. या वेबसाईट्सना कराचा भारही कमी असल्याने सरकारचंही यात नुकसान होतं, असं या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
ऑनलाईन विक्रीमुळे दुकानांवर संक्रात येत असून अनेक व्यावसायिकांना दुकानं बंद करायची वेळ आली आहे. दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्याही धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे हा उपाय योजावा लागत असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
summary- ulhasnagar traders to bombard fake orders on e comm sites



























































