
सामना प्रतिनिधी । मुंबई
‘ओला’-‘उबेर’च्या ऑनलाइन सुविधेमुळे नागरिकांनी ही प्रवासीसेवा स्वीकारली आहे. मात्र प्रत्यक्षात या दोन्ही कंपन्या शहर टॅक्सी योजनेत सहभागी झालेल्या नाहीत. त्यांना शहर टॅक्सी योजनेत सहभागी करण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर त्यांनी या योजनेला कोर्टातून स्टे घेतला. त्यामुळे शहरात जर टॅक्सी सेवा चालवायची असेल तर त्यांनी शहर टॅक्सी योजनेत सहभागी व्हायलाच हवे, असे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले.
मागील 13 दिवसांपूसन ओला-उबेर चालकांचा संप सुरू आहे. या संपाबाबत दिवाकर रावते यांना पत्रकारांनी विचारले असा ते म्हणाले, प्रत्यक्षात हा वाद खासगी मालक आणि चालकांचा आहे. ओला आणि उबेरकडून ऑल इंडिया परमिट घेऊन ही सेवा सुरू करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात नियमानुसार ओला आणि उबेरने शहर टॅक्सी योजनेत सहभागी व्हायला हवे.
ओला-उबेर चालकांची मंत्रालयासमोर निदर्शने
ओला आणि उबेर चालक-मालकांनी गेल्या 13 दिवसांपासून बेमुदत संप पुकारला आहे. यातील काही चालकांनी आज मंत्रालयासमोर निदर्शने केली.































































