शिर्डीत गटारीच्या चेंबरमध्ये गुदमरून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

सामना प्रतिनिधी । शिर्डी 

शिर्डी येथील कालीकानगर परीसरात नगरपंचायतीच्या ड्रेनेज मधील पाणी शेतीसाठी उपसा करताना दोन शेतकऱ्यांचा ड्रेनेज मधे गदमरून मृत्यू झाला तर एक जण बचावला. हि घटना शनिवारी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास शिर्डीतील कालीकानगर परीसरात घडली. या भागातून शिर्डी नगरपंचायतीची ड्रेनेज पाईप लाईन जाते या गटारीतील पाणी शेतीसाठी शेतकरी वापरतात. या चेंबरमध्ये संदिप अशोक कोते व गंगाधर गाडेकर हे दोघे शेतकरी उतरून काही तरी काम करत असताना पाईपलाईन मधील विषारी वायुमुळे दोघांचा मृत्यू झाला. त्यांना वाचविण्यासाठी मदतीला गेलेला तिसरा शेतकरी मात्र बचावला.

यापुर्वीही नगरपंचायतीच्या चेंबरमध्ये गुदमरून चार शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर ही दुसरी घटना होय. शिर्डी व परीसरात पाण्याची तीव्र टंचाई असून या गटारीच्या पाण्याचा वापर शेतकरी करतात. दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी ते पाठविण्यात आले आहे. रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. यातील मृत संदिप कोते या शेतकऱ्याचा दोन दिवसापुर्वीच वाढदिवस होता या घटनेने शिर्डी परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.