नगरमध्ये दुष्काळाचे सावट कायम, पाणी टंचाई निवारणार्थ 67 कोटींचा आराखडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
जगातील 85 टक्के लोक दुष्काळी भागात राहतात

सामना प्रतिनिधी ।  नगर 

जिल्ह्यात दुष्काळाचे सावट कायम असून दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने टँकरची संख्येत वाढ होताना दिसत आहे. वाढत्या पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. ऑक्टोबर 2018 ते जून 2019 या नऊ महिन्यांच्या कालावधीतील टंचाई निवारणार्थ करण्यात येणार्‍या उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

याकाळात एक हजार 390 उपाययोजना प्रस्तावित असून त्यासाठी 67 कोटी 33 लाख 74 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

दरवर्षी भविष्यात उद्भवणार्‍या टंचाई परिस्थितीचा अंदाज बांधत टंचाई निवारण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांचा कृती आराखडा तयार करण्यात येतो. या आराखड्याचा कालावधी ऑक्टोबर ते जूनपर्यंत निर्धारीत असतो. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने ऑक्टोबर 2018 ते जून 2019 पर्यंतच्या कालावधीत करावयाच्या उपाययोजना विचारात घेऊन टंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार केला आहे.

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक, जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांची या आरखड्यावर सही आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मान्यतेनंतर हा आराखडा विभागीय आयुक्त व राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे.

कृती आराखड्यात एकूण नऊ योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बुडक्या खोदणे, विहिरी खोल करणे व गाळ काढणे, गाव-वाड्यांसाठी व टँकर भरण्यासाठी खासगी विहिरी अधिग्रहण करणे, टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे, प्रगतीपथावरील नळ योजना तत्काळ पूर्ण करणे, नळ योजनांची विशेष दुरुस्ती करणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती करणे, नवीन विंधन विहिरी घेणे, तात्पुरत्या पूरक नळ योजना घेणे, अशा उपाययोजनांचा यात समावेश करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार जिल्ह्यातील 1 हजार 32 गावे व 3 हजार 68 वाड्यांसाठी या कृती आराखड्यामध्ये 1 हजार 390 उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.