कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

अमित घोडेकर,[email protected]

सोफिया यंत्रमानवाप्रमाणे आता वृत्तनिवेदन करणारा यंत्रमानव आला आहे. काय आहे हे तंत्रज्ञान…

गेल्या आठवडय़ात सगळ्या जगाला चकित करणारी एक गोष्ट घडली आहे, चीनच्या झीन्जुवा या सरकारी वृत्तवाहिनीने तंत्रज्ञानाच्या विश्वात मैलाचा दगड ठरेल अशी एक मोठी गोष्ट सादर केली आणि सगळीकडे फक्त त्याचीच चर्चा सुरु आहे. ही बातमी म्हणजे आजपर्यंत जगातील सगळ्या टीव्हीवर बातम्या सांगण्यासाठी वृत्तनिवेदन करणाऱया माणसाची जागा आता चक्क एक रोबॉट घेणार आहे. झीन्जुवाने हा अस्सल मनुष्यासारखा दिसणारा आणि मनुष्यासारखाच बोलणारा वृत्तनिवेदक आपल्यासमोर ठेवून सगळ्यांनाच मोठा धक्का दिला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात काम करणाऱया अमेरिका तसेच जपानसारख्या देशांनादेखील तोंडात बोट घालावे लागले आहे.

या रोबॉटचा वापर ब्रेकिंग न्युज, हवामानाच्या बातम्या अशा अनेक गोष्टींसाठी यापुढे केला जाणार आहे,  ड्रायव्हरलेस कार, जिच्यावर सध्या खूप मोठय़ा प्रमाणात संशोधन सुरु आहे तीदेखील कृत्रिम बुद्धिमत्ता याच संकल्पनेवर आधारली आहे. गुगल, ऊबर हे मोठय़ा प्रमाणात सध्या ड्रायव्हरलेस कारवर काम करत आहेत. या तंत्रज्ञानामुळे भविष्यात कोणतीही गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हरची गरज पडणार नाही. भविष्यात जर कधी तुम्ही ऊबरची कार बुक केली आणि समोर गाडी साक्षात उभी राहिल्यावर तिच्यात ड्रायव्हर नसल्यास अजिबात घाबरून जाऊ नका. पुढच्या ऑलिम्पिक खेळात खेळाडूंना नेण्यासाठी अशाच ड्रायव्हरलेस कारचा वापर केला जाणार आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचा वापर सध्या ड्रोनमध्येही बऱयाच मोठय़ा प्रमाणात केला जात आहे. हे ड्रोनदेखील अगदी पिझ्झा डिलिव्हरी ते अगदी फोटो काढण्यासाठी किंवा अनेक गोष्टींसाठी वापरले जाणार आहे. गेल्या वर्षी सगळ्या जगाने ‘सोफिया’ नावाची रोबॉट बघितली. आता सोफियासारखेच अनेक रोबॉट वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जात आहेत. सध्या हिंदुस्थानात एका मोठय़ा बँकेतदेखील रोबॉटचा वापर केला जातो. हा रोबॉट ग्राहकांचे चेक वटवणे, वेगवेगळ्या गोष्टींची माहिती देणे,  अशी अनेक कामे करत आहे. एकंदरीत काय तर कृत्रिम बुद्धिमत्ता हे नवीन तंत्रज्ञान अनेक ठिकाणी वापरले जाऊ शकते याची ही पोचपावतीच आहे.आजकाल बऱयाच ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून संगणक मनुष्याच्या प्रश्नांना उत्तर देत आहे.

सध्या तर शास्त्रज्ञ याच्या एक पाऊल पुढचा विचार करत आहेत. म्हणजेच संगणक चालवण्यासाठी माणसाची गरजच राहणार नाही. त्यासाठी संगणकातच छोटे छोटे कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारे बॉट्स म्हणजेच छोटे रोबोट्स बनवले तर यातदेखील अनेक ठिकाणी यशस्वी कामे होत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे भविष्यात अनेक लोकांच्या नोकरीवर गदा येऊ शकते. यामुळे वर्षाचे काम महिन्यात, महिन्यांचे काम दिवसात आणि दिवसाचे काम मिनिटात होणार आहे, पण या तंत्रज्ञांनामुळे अनेक नवीन रोजगारदेखील निर्माण होणार आहेत.