शक्तिशाली ‘रोमिओ’च्या खरेदीने हिंदुस्थानी नौदल होणार ‘पॉवरफुल’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

जगात सध्या अतिशय अत्याधुनिक म्हणून गणली गेलेली ‘एमएच-60 रोमिओ सीहॉक’ ही बहुउद्देशीय पाणबुडीविरोधी 24 हेलिकॉप्टर्स हिंदुस्थान लवकरच अमेरिकेकडून खरेदी करणार आहे. यामुळे हिंदुस्थानच्या नौदलाची ताकद वाढणार आहे. हिंदी महासागरात चीनवर दबाव ठेवण्यासाठी ही हेलिकॉप्टर्स महत्त्वाची भूमिका बजावू शकतील असे संरक्षणतज्ञांचे मत आहे. या एका हेलिकॉप्टरची किंमत 2 अब्ज डॉलर आहे. टप्प्याटप्प्याने अशी एकूण 123 हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याची हिंदुस्थानची योजना असून त्यासाठी 150 अब्ज रुपये खर्च येणार आहे.

ही हेलिकॉप्टर्स सध्या अमेरिकेच्या नौदलात तैनात आहेत. या हेलिकॉप्टरचे वैशिष्टय़ म्हणजे यावरून क्षेपणास्त्र डागले तर ते पाणबुडीचा अचूक वेध घेते. जगात इतर देशांकडेसुद्धा अशी हेलिकॉप्टर्स आहेत, पण त्या तुलनेत अमेरिकेची ही रोमिओ हेलिकॉप्टर्स सरस ठरणार आहेत. हिंदी महासागरातील चीनचे आक्रमक रूप लक्षात घेऊन तत्काळ या 24 हेलिकॉप्टर्सची मागणी हिंदुस्थानने अमेरिकेकडे एक पत्र पाठवून केली आहे. अमेरिकेच्या सहकार्याने हिंदुस्थानी कंपनीच्या भागीदारीतून ही 123 हेलिकॉप्टर्स हिंदुस्थानात निर्माण करण्याची भविष्यात योजना आहे. युद्धकाळात शत्रूपक्षाकडून पाणबुडीवरून हवेत, जमिनीवर लक्ष्यावर क्षेपणास्त्राचा मारा केला जातो. पाणबुडीवर  निशाणा साधण्यासाठी हे हेलिकॉप्टर महत्त्वाची भूमिका बजावू शकेल.