
सामना ऑनलाईन । विजयवाडा
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी नुकतीच त्यांची व त्यांच्या कुटुंबाची संपत्ती जाहीर केली आहे. नायडूंनी जाहीर केलेल्या संपत्तीच्या माहितीनुसार त्यांचा तीन वर्षांचा नातू देवांश हा त्यांच्या पेक्षा जास्त श्रीमंत आहे. देवांशची संपत्ती ही चंद्राबाबूंच्या संपत्तीपेक्षा तब्बल सोळा कोटीने जास्त आहे. देवांशच्या नावे सध्या 18.72 कोटींची संपत्ती असून तो नायडू कुटुंबातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरला आहे.
चंद्राबाबू नायडू हे गेली आठ वर्ष दरवर्षी त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची संपत्ती जाहीर करतात. सध्या चंद्राबाबूंची संपत्ती 2.99 कोटी असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे. चंद्राबाबूंचा मुलगा व आंध्रप्रदेशचे आयटी व पंचायत राज मंत्री नारा लोकेश यांची संपत्ती 21.40 कोटी असून गेल्या वर्षी त्यांची संपत्ती 15.21 कोटी होती. चंद्राबाबूंची पत्नी व हरिटेज फुड्स लिमिटेडच्या प्रमुख भुवनेश्वरी यांची संपत्ती 31.01 कोटी आहे. देवांशनंतर भुवनेश्वरी यांच्या नावावर सर्वाधिक संपत्ती असल्याचे समोर आले आहे.






























































