लेख : बियाण्यांच्या किमती हिंदुस्थानातच जास्त का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> चिमणदादा पाटील दहिवदकर

जगात चीन, ऑस्ट्रेलिया, ब्राझील आदी देशांत कंपन्या बियाण्यांच्या किमती कमी ठेवतात. मग हिंदुस्थानात कोणत्या आधारावर किमती जास्त ठेवतात?  इतर देशांत बीटीचे सरळ वाण उपलब्ध असताना हिंदुस्थानातच संकरित वाणाचा आग्रह का धरला जातो? संकरित वाणामुळे दरवर्षी शेतकऱ्याला बीटी कॉटन बियाणे विकत घ्यावे लागते. हा शेतकऱ्यांना उघड उघड लुटण्याचा डाव नव्हे काय? मात्र जेनेटिक इंजिनीअरिंग ऍप्रुव्हल कमिटीने, तपशीलवार चौकशी न करता बीटी कॉटन वाणांना परवाना देण्याचा धमाका सुरू ठेवला आहे हे काय गौडबंगाल आहे ते समजत नाही.

जगात पीक संरक्षणासाठी कीटकनाशकांचा, रासायनिक औषधांवर जेवढा खर्च होतो त्याच्या निम्मा खर्च हा फक्त कापसावरील कीड नियंत्रणासाठी होतो. त्यातही कापूस पिकावरील सर्वात मोठा धोका गुलाबी बोंडअळीचा. शास्त्रज्ञांच्या अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर बीटी हे वाण बाजारात आले. हिंदुस्थान सरकार कोणतेही अचूक संक्रमित वाण बाजारात योजना पर्यावरण व्यवस्थापनाअंतर्गत जनुक अभियांत्रिकी मान्यता समितीचा (जीईएसी) शब्द अखेरचा मानते. त्यांच्या सहा वर्षांच्या चाचण्यांनंतर हिंदुस्थानी कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली (जेसीएआर) यांनी घेतलेल्या एका वर्षाच्या चाचणी निष्कर्षात त्यांना बीटी वाणाचा परिणाम हा अपेक्षेपेक्षा चांगला आढळून आला. या जनुक सुधारीत वाणाचा निसर्गावर कोणताही विपरीत परिणाम करीत नाही ना यासाठी बायोसेफ्टी असेसमेंट कमिटी बोर्ड यांनी घेतलेल्या चाचणीनंतर हे वाण प्रदूषणविरहित ठरवून सर्वांसाठी खुले करण्यात आले.

या बीटी वाणामुळे देशातील कापसाच्या उत्पादक क्षमतेत प्रचंड वाढ झाली. त्यामुळे हिंदुस्थान जगात तिसरा कापूस उत्पादक देश बनला. मात्र 10-12 वर्षांच्या कालावधीनंतर बोंडअळीची प्रतिकार क्षमता वाढत गेली. कितीही फवारे मारा, पण बोंडअळी मेलीच नाही. ती एकदा बोंडात घुसली की, बोंडाला फस्त केल्याशिवाय बाहेर पडत नाही. उलट तिच्यावर फवारणी करणारी आतापर्यंत 52 माणसे यमराजाच्या दरबारात दाखल झाली आहेत. बीजी-2 काम करत नाही म्हणून इतर राष्ट्रांत बीजी-4 व बीजी-5 चे संशोधन पुढे आलेले आहे, परंतु आपल्या देशाचे सरकार या नवीन कृषी संशोधनास परवानगी देत नाही. या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार. शेतकऱ्यांच्या तंत्रज्ञानासाठी स्वदेशी धोरण, मात्र इतर सर्वांसाठी विदेशी तंत्रज्ञान चालते.

वडोदरा कृषी विद्यापीठाने शोधलेल्या देशी सुधारीत कापूस वाणाचा चांगला प्रसार झाला. पूर्ण सौराष्ट्र, मध्य गुजरात यात कापसाखालील क्षेत्र अधिक होते. जुनागड, राजकोटचा कापूस देशात सर्वाधिक गुणवत्तापूर्ण ठरला. तसेच गुजरातचे कापूस लागवड क्षेत्राच्या हे 30 टक्के क्षेत्र ओलिताखाली असून तिथे सूक्ष्म तंत्रज्ञानाचा 100 टक्के वापर केला जातो. तिथे 2014-15 साली सर्वप्रथम बोंडअळी आली. लागलीच सरकारने तिला रोखण्यासाठी 21 कोटी रुपये खर्च करून शेतकऱ्यांना  एक लाखावर कामगंध सापळे मोफत वाटले. जिनिंग, प्रेसिंग, कारखाने, सूतगिरण्यांमध्येही कामगंध सापळे लावले. बोंडअळीवर प्रतिबंधक उपाय म्हणून दोन वर्षे हा कार्यक्रम राबविला. तसेच कापूस बियाणे उत्पादक व पुरवठादार यांच्यावरही जबाबदारी टाकली. त्यासाठी निधी उभारला. हा कार्यक्रम गुजरात पॅटर्न म्हणून ओळखला जातो. त्यामुळे  2017-18 च्या हंगामात गुलाबी बोंडअळी नव्हती. महाराष्ट्रालगतच्या तापी खोऱ्यात ती आली. कापूस उत्पादकांच्या दृष्टीने वडोदरा कृषी विद्यापीठाचा देशी वाणाचा गुजरात पॅटर्न आर्थिक हिताचा असताना तो पंतप्रधान मोदी यांनी देशात का राबविला नाही?

2016-17 ला राज्यात 42 लाख हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड झालेली होती. त्यात 32 लाख हेक्टर क्षेत्र बोंडअळीमुळे बाधित झाले होते. त्या बाधित झालेल्या 13 लाख 55 हजार शेतकऱ्यांसाठी दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी खास पॅकेज जाहीर केले होते. त्याप्रमाणे कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी 30 हजार 800 रुपये तर बागायत शेतकऱ्यांसाठी 37 हजार 500 रुपये हेक्टरी आर्थिक मदत देण्याची घोषणा 22 डिसेंबर 2017 रोजी केली. तिची मर्यादा दोन हेक्टरपर्यंत ठेवली. अशा प्रकारे घोषणांचा सुकाळ. मात्र मूलभूत भूमिकेतून अंमलबजावणीचा दुष्काळ.

खान्देश विभागात कापसाचे हुकमी पीक घेतले जाते. बोंडअळीने फडशा पाडलेल्या क्षेत्राची पाहणी करण्यात आली. कार्यतत्पर नोकरांनी काटेकोर पाहणी करून अहवाल सादर केले. त्यानुसार नंदूरबार जिह्यात कापूस लागवड क्षेत्र 1.20 लाख हेक्टर, 29 रेव्हेन्यू सर्कल, पण एकाही सर्कलमध्ये बोंडअळीने 33 टक्क्यांच्या वर नुकसान केलेले दिसून आलेले नाही. धुळे जिल्ह्यात कापूस लागवड क्षेत्र दोन लाख हेक्टर, 35 सर्कल मात्र फक्त दोन सर्कलमध्येच बोंडअळीने 33 टक्क्यांच्या वर नुकसान केलेले दिसून आले. जळगाव जिल्ह्यात कापूस लागवड क्षेत्र चार लाख 74 हजार हेक्टर, 36 सर्कलपैकी 24 सर्कल बोंडअळी बाधित. त्यासाठी कोरडवाहू शेतकऱ्यांना 6,800 रुपये व बागायतदार शेतकऱ्यांना 13,600 रुपये, कमीतकमी 1,000 रुपये दोन हेक्टरपर्यंत मर्यादा. खान्देशात आठ लाख हेक्टर क्षेत्र बोंडअळीमुळे बाधित झाले होते. अशा प्रकारे बीटी बियाणे बोंडअळीचा आर्थिक फटका कापूस उत्पादकांनाच बसतो. काही राज्यांत स्वतंत्र कापूस कायदा असून त्यात बियाण्यांबाबत बियाणे उत्पादक कंपन्यांकडून नुकसानभरपाईची तरतूद आहे.

जगात चीन, ऑस्ट्रेलिया, ब्राझील आदी देशांत कंपन्या बियाण्यांच्या किमती कमी ठेवतात. मग हिंदुस्थानात कोणत्या आधारावर किमती जास्त ठेवतात?  इतर देशांत बीटीचे सरळ वाण उपलब्ध असताना हिंदुस्थानातच संकरित वाणाचा आग्रह का धरला जातो? संकरित वाणामुळे दरवर्षी शेतकऱ्याला बीटी कॉटन बियाणे विकत घ्यावे लागते. हा शेतकऱ्यांना उघड उघड लुटण्याचा डाव नव्हे काय? मात्र जेनेटिक इंजिनीअरिंग ऍप्रुव्हल कमिटीने, तपशीलवार चौकशी न करता बीटी कॉटन वाणांना परवाना देण्याचा धमाका सुरू ठेवला आहे हे काय गौडबंगाल आहे ते समजत नाही. मात्र याबाबत किमती निष्कर्ष अन्वेषण विभागाच्या महासंचालनालयाने (डीजीटीआर) त्या अवास्तव असल्याचा निष्कर्ष काढला. मग त्याबाबत जीन कॅम्पेन, अन्य स्वयंसेवी संस्था तसेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश यांनी हा अभ्यास केला, तर जीन कॅम्पेनच्या सदस्या व जनुक शास्त्रज्ञ डॉ. सुमन सहाय यांनी कंपनीच्या चौकशीची मागणी केली. तसेच जीईएसीच्या कारभाराची चौकशी ही केंद्रीय दक्षता पथकाकडून केली जावी अशी मागणीही जीन कॅम्पेनकडून करण्यात आली, पण त्याची दखल घेण्यात आली नाही. तसेच सरकारने कंपनीला सरळ वाण देण्याबाबत आदेश द्यावयास पाहिजे होते. त्याकडेही हेतूपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले.

वास्तविक कृषीप्रधान हिंदुस्थानच्या दृष्टीने शेती सुरक्षेचा प्रश्न हा राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित आहे. राष्ट्रीय ज्ञान आयोगाच्या माजी उपाध्यक्षा डॉ. पुष्पा भार्गव यांनी एक निरीक्षण नोंदविले आहे. त्या 11 ऑगस्ट 2009 च्या ‘दी हिंदू’च्या एका लेखात म्हणतात, ‘‘या देशावर एखाद्या बाह्य सत्तेने नियंत्रण ठेवण्याची आकांक्षा बाळगली तर त्यांना या देशावर अणुबॉम्ब टाकण्याची गरज नाही. त्यांनी हिंदुस्थानी शेतीवर पकड बसवून बियाण्यांवर नियंत्रण प्रस्थापित केले तरी पुरेसे आहे. याबाबत हिंदुस्थान सरकार किती संवेदनशील आहे! तसे नसते तर आज हिंदुस्थानातील 30 टक्के बियाणे उद्योग बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हाती गेलाच नसता.