मलठणच्या शिंदेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात घोडा ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कवठे येमाई

शिरूर तालुक्यातील मलठणच्या शिंदेवाडीत आजशुक्रवार दि.३० पहाटेच्या सुमारास बिबट्याने मेंढपाळ तिखोळे यांनी शेतात बांधलेल्या घोड्यावर हल्ला करीत त्याला ठार केले आहे. या घटनेने बहुसंख्य मेंढपाळ असलेल्या शिंदेवाडीतील कुटुंबीयांमध्ये मोठीच दहशत निर्माण आहे.

मलठणच्या शिंदेवाडीतील मेंढपाळ भागा बाबू तिखोळे यांनी आपल्या शेतालगत असलेल्या ओढ्याच्या कडेला सुमारे ३ वर्ष वयाचा मोठा घोडा बांधला होता. पहाटेच्या सुमारास बिबट्याने या घोड्यावर हल्ला करीत त्याला ठार मारले. त्यामुळे या शेतकर्याचे सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे तिखोळे यांनी सांगितले. शिरूर वन विभागाला या घटनेची माहिती मिळताच वन कर्मचारी हनुमंत कारकूड यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून शासनाकडून नियमानुसार या शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळण्याकामी प्रयत्न केले जातील असे आश्वासन शिरूरचे वन अधिकारी तुषार ढमढेरे यांनी सांगितले.

घोड्यासारख्या पाळीव प्राण्यांना बिबट्याने लक्ष करीत ठार मारल्याने रात्रीच्या वेळी शेतीत पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या शेतक-यांमध्ये मोठीच भीती निर्माण झाली आहे. या ठिकाणी वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशीमागणी उत्तम लकडे, सतीश शिंदे, खंडू तिखोळे,विकास शिंदे ग्रामस्थानी केली आहे.