
>> जयेंद्र लोंढे
मार्गरेट कोर्ट, किम क्लायस्टर्स या टेनिसपटूंनी बाळाला जन्म दिल्यानंतरही टेनिसमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी करून दाखवली. मेरी कोमनेदेखील तीन मुलांच्या जन्मानंतरही बॉक्सिंगमधील दबदबा कायम राखला. बॉक्सिंगमधील राणी बनत हिंदुस्थानची सुपर मॉम होण्याचा मानही मिळवला.
भेदक नजर… प्रतिस्पर्ध्याला गारद करणारे ठोसे… वेगवान हालचाली… आक्रमकता… अन् कोणत्याही परिस्थितीला समर्थपणे सामोरे जाण्याची जिद्द… बॉक्सिंगची ही वैशिष्टय़े. मोहम्मद अली, माईक टायसन यांनी आपल्या बेडर स्वभावामुळेच व्यावसायिक बॉक्सिंगवर हुकुमत गाजवली. त्या काळात हिंदुस्थानातून बॉक्सिंगमध्ये अशीच ‘रावडी’ प्रतिभा निर्माण होईल असे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते, पण मणिपूरमधील कांगाथेई या छोटय़ा गावात 35 वर्षांपूर्वी जन्मलेल्या मेरी कोम हिने हे स्वप्न प्रत्यक्षात आणले. नवी दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये तिने सहाव्या सुवर्ण पदकाला गवसणी घातली आणि क्युबाच्या फेलिक्स सॅवोनच्या सर्वाधिक पदके जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी साधली.
बॉक्सिंगच्या रिंगणात प्रतिस्पर्ध्याला भिडण्याची वृत्ती अंगात असावी लागते. मेरी कोमला ती घरच्या बेताच्या परिस्थितीतूनच मिळाली. पूर्व हिंदुस्थानातील एका शेतकरी कुटुंबात तिचा जन्म झाला. तिला अगदी लहानपणापासूनच शेतामध्ये आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी झगडावे लागले. खेळण्याबागडण्याच्या वयात ती आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जिवाचे रान करत होती. जगण्यासाठीचा हा संघर्ष तिला बॉक्सिंगमध्ये उत्तुंग शिखरावर घेऊन गेला. माईक टायसन काही दिवसांपूर्वी मुंबईत आला असताना तो म्हणाला होता, गरीब वस्त्यांमधूनच चॅम्पियन खेळाडू घडतात. हे त्याचे वाक्य मेरी कोमसाठी तंतोतंत फिट बसते. मात्र नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओपन स्कूलिंग (एनआयओएस) येथून तिने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शालेय स्तरावर तिने ऍथलेटिक्स, व्हॉलीबॉल, फुटबॉल या खेळांमध्ये हात आजमावले. मात्र मणिपूरच्याच डिंको सिंग याने 1998 साली बँकॉक येथे झालेल्या आशियाई गेम्समध्ये बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदक जिंकले आणि मेरी कोमच्या जीवनाला कलाटणी मिळाली. डिंको सिंगच्या सुवर्ण पंचनेच मणिपूरमधील अनेक युवकांना बॉक्सिंगच्या रिंगणात आणले. मेरी कोम त्यापैकीच एक.
इम्फाळ येथील के कोसाना मेईतेई यांच्या मार्गदर्शनाखाली तिने बॉक्सिंगचे बाळकडू घेतले. कालांतराने मणिपूरचे बॉक्सिंग प्रशिक्षक नरजीत सिंग यांची तालीम तिला मिळाली. बॉक्सिंगमध्ये करीअर करायचे हे तिने आपल्या वडिलांपासून लपवून ठेवले होते. वास्तविक मेरी कोमचे वडील स्वतः कुस्तीपटू, पण बॉक्सिंगमुळे मेरी कोमच्या चेहऱयाला इजा झाल्यास तिच्या लग्नात अडथळा येऊ शकतो अशी भीती त्यांना वाटत असे. मात्र मेरी कोमने 2000 मध्ये राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा जिंकली अन् वडिलांचे मन बदलले. नंतर कुटुंबाकडूनही तिला पाठबळ मिळाले.
क्रिकेटवेडय़ा हिंदुस्थानात गेल्या काही वर्षांमध्ये इतर खेळांचेही वारे जोरात वाहू लागले आहेत. कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, टेनिस, बुद्धिबळ, ऍथलेटिक्स, नेमबाजी, बॉक्सिंग, टेबलटेनिस, हॉकी यांसारख्या खेळांत हिंदुस्थान क्रीडाविश्वात प्रगतिपथावर आहे. विश्वनाथन आनंदने बुद्धिबळात, लिएण्डर पेस, महेश भूपती, सानिया मिर्झाने टेनिसमध्ये, सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटनमध्ये क्रांती केली आहे. बॉक्सिंगमध्ये महिला चमत्कार करू शकतात हे मेरी कोमने दाखवून दिले. तिच्याच करिष्म्यामुळे सोनिया चहलसारख्या युवा खेळाडूने जागतिक चॅम्पियनशिपमध्ये हिंदुस्थानला रौप्य पदक जिंकून दिले. मेरी कोमच्या मेहनतीचे हे फळ आहे. मार्गरेट कोर्ट, किम क्लायस्टर्स या टेनिसपटूंनी बाळाला जन्म दिल्यानंतरही टेनिसमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी करून दाखवली. मेरी कोमनेदेखील तीन मुलांच्या जन्मानंतरही बॉक्सिंगमधील दबदबा कायम राखला. बॉक्सिंगमधील राणी बनत हिंदुस्थानची सुपर मॉम होण्याचा मानही मिळवला. नवरा फुटबॉलपटू असल्यामुळे त्याने मेरी कोमचे बॉक्सिंवरील प्रेम समजून घेतले. मेरी कोमच्या आयुष्यात त्याचाही सपोर्ट मोलाचा ठरला. मेरीने 2001 साली अमेरिकेत झालेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पहिले पदक जिंकले. हे पदक तिने ताकद व स्टॅमिना याच जोरावर जिंकले होते. तब्बल अठरा वर्षांनंतर तिने जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या वेळी ती म्हणाली होती की, ‘आता मला प्रतिस्पर्ध्यांकडून ठोसे पडलेले आवडत नाहीत. विनाकारण एनर्जीही घालवायला आवडत नाही. कॅलक्युलेटिव्ह खेळायला आवडते.’ 48 ते 51 किलो वजनी गट यामध्ये तिचा कस लागला आहे. खरे म्हणजे तिला 48 किलो वजनी गटात खेळायला आवडते. याच वजनी गटात तिने बहुतांश पदके जिंकली आहेत, पण ऑलिम्पिकमध्ये कमी वजन गटांचा समावेश नसल्यामुळे तिला 51 किलो वजनी गटात खेळावे लागते. 2012 मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये तिने कास्य पदक जिंकले आणि आता तिला 2020 मध्ये टोकियो येथे होणाऱया ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घालायची आहे. हिंदुस्थानी सुपर मॉम बनलेली मेरी कोम ही कामगिरीही यशस्वीपणे पार पाडेल हे निश्चित!





























































