
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
जीवजंतूंना पाणी देऊन जीवन समृद्ध करणाऱ्या नदीला जीवनदायिनी मानण्याची परंपरा हिंदुस्थानात फार प्राचीन आहे. पण, आधुनिक काळात या नद्यांचंच जीवन धोक्यात आल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. हिंदुस्थानातील 223 नद्या अत्यंत प्रदूषित असून गंगा आणि यमुना या नद्यांमध्ये स्नान करणंही अशक्य असल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे.
जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळाकडे दाखल झालेल्या एका आरटीआयला उत्तर देताना ही माहिती समोर आली आहे. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, देशातल्या 62 टक्के नद्या या भयंकर प्रदूषित आहेत. यात गंगा, यमुनेसह त्यांच्या उपनद्यांचाही समावेश आहे. या अहवालात एकून 521 नद्यांचा अभ्यास करून त्यांचा लेखाजोखा मांडला आहे. यातील फक्त 198 नद्याच स्वच्छ असून त्यात बहुतांश छोट्या नद्यांचा समावेश आहे. तसंच या अहवालात सर्वाधिक प्रदूषणग्रस्त नद्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असून महाराष्ट्रात सुमारे 45 नद्या प्रदूषित आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशाचा क्रमांक असून तेथील 11 नद्या प्रदूषित आहेत. आग्नेय हिंदुस्थानातील नद्या या सर्वाधिक स्वच्छ नद्या असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.
प्रदूषणाचं मुख्य कारण नद्यांच्या किनाऱ्यावरील शहरांमध्ये दडलं आहे. शहरांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प नाहीत. त्यामुळे ते नद्यांमध्ये सर्रास सोडलं जातं. याखेरीज नदीत सोडले जाणारे मलमूत्र, मानव आणि प्राण्यांचे मृतदेह, कचरा, प्लास्टिक यांमुळे दररोज नद्यांच्या प्रदूषणात वाढ होताना दिसत आहे. प्रदूषणाची पातळी वाढली की पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. म्हणूनच नदी आणि समुद्रातील प्राण्यांच अस्तित्वही धोक्यात आलं आहे.






























































