
सामना प्रतिनिधी । मुंबई
मराठा समाजानंतर आता धनगर समाज आक्रमक झाला आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्याचे निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन देऊनही त्याची पूर्तता केली नाही असा आरोप करीत धनगर समाजाच्या वतीने आज मुंबई व नागपूरमध्ये भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्याची जाहीर होळी करण्यात आली. धनगर समाजाच्या आरक्षणावर तात्काळ निर्णय घेतला नाही तर राज्यात भाजपच्या एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही. आरक्षणाचे आश्वासन देणाऱया भाजपच्या मंत्र्यांना जाब विचारला जाईल असा इशारा महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाच्या वतीने देण्यात आला.
धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन अगदी अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी दिले होते. मागील निवडणुकीत सोलापूरमधील जाहीर सभेत नरेंद्र मोदी यांनीही आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बारामतीमध्ये झालेल्या कार्यक्रमात धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. त्याशिवाय भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्वासन होते. पण सत्तेत आल्यावर भाजपने आश्वासन पाळले नाही, असे शेंडगे म्हणाले.



























































