
सामना प्रतिनिधी, इगतपुरी
येथील भूमिअभिलेख विभागाच्या कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नेमलेल्या खासगी व्यक्तींमुळे मौल्यवान कागदपत्रांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. उपअधीक्षक दत्तात्रय वाघ यांच्या निदर्शनास ही गंभीर बाब आणून देऊनही खासगी व्यक्तींकडून कार्यालयात कामकाज सुरूच होते. खासगी व्यक्तींच्या मदतीने अधिकारी आणि कर्मचारी ‘अर्थ’ पूर्ण कामे करीत असल्याचा आरोप उपस्थित शेतकऱ्यांनी केला आहे.
येथे जमिनीचा आत्मा समजले जाणारे विविध अभिलेख उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात जतन करण्यात येतात. जमिनीची मोजणी, हद्द खुणा कायम करणे, पोट हिस्सा मोजणी, विविध महत्त्वाच्या कागदपत्रांच्या नकला देणे आदी कामे करण्यात येतात. तथापि गेल्या काही महिन्यांपासून या कार्यालयात खासगी व्यक्तींची अनधिकृत नेमणूक करण्यात आली आहे. या व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणावर सामान्य शेतकऱयांची पिळवणूक होत असल्याचेही दिसून आले आहे. शासकीय शुल्क भरून मोजणी न करता या खासगी व्यक्ती कार्यालयातले मौल्यवान रेकॉर्ड बाहेर नेऊन मोठी रक्कम घेत मोजण्या करीत असल्याचाही आरोप सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर आज भूमिअभिलेख कार्यालयात भेट दिली असता मुख्यालय सहाय्यक मिलिंद जगताप यांनी एका व्यक्तीला कार्यालयात कामकाज करण्यासाठी नियुक्त केल्याचे दिसून आले. उपअधीक्षक दत्तात्रय वाघ यांची भेट घेऊन ही गंभीर बाब लक्षात आणून देण्यात आली, मात्र तरीही त्यांनी संबंधितांवर कारवाई करू असे मोघमपणे सांगितले.
खासगी व्यक्ती काम करीत असल्याचे समजताच संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटिसा दिल्या आहेत. कुठल्याही शेतकऱयाला कोणतीही समस्या येणार नाही याबाबत आम्ही दक्षता घेणार आहोत.
-दत्तात्रय वाघ, उपअधीक्षक भूमिअभिलेख इगतपुरी
खासगी व्यक्तींकडून शेतकऱयांना वेठीस धरण्याचे प्रकार दिसले आहेत. महत्त्वाची कागदपत्रे गायब झाल्यास कोणाला जबाबदार धरणार? संबंधित दोषींवर कठोर कारवाई करा.
-अभय पार्टे, शेतकरी

























































