हिंदुस्थानपुढे नेदरलॅण्डचे आव्हान, जागतिक हॉकी स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । भुवनेश्वर

जागतिक हॉकी स्पर्धेत 43 वर्षांनंतर पदक जिंकण्याच्या इराद्याने उतरलेल्या हिंदुस्थानपुढे आज (दि.13) उपांत्यपूर्व लढतीत तुल्यबळ नेदरलॅण्डचे आव्हान असेल. यजमानांना या लढतीत विजय मिळविण्यासाठी सर्वस्व पणाला लावावे लागेल. कारण नेदरलॅण्डने दोन सामन्यांत 10 गोल ठोकून आपले इरादे स्पष्ट केले आहेत.

जागतिक क्रमवारीत नेदरलॅण्ड सहाव्या तर हिंदुस्थान पाचव्या स्थानी आहे. हिंदुस्थानने ‘क’ गटातून दोन विजय व एका ड्रॉसह अव्वल स्थानासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. दुसरीकडे नेदरलॅण्डने ‘ड’ गटातून दुसऱ्या स्थानी राहत आगेकूच केलेली आहे. सिमरनजीत सिंह, ललित उपाध्याय, मनदीप सिंह व ओडिशाचा ड्रग फ्लिकर रोहिदाससह इतर हिंदुस्थानी खेळाडूंनी चांगली कामगिरी केलेली आहे, मात्र तरीही डचांपुढे अखेरच्या टप्प्यात हिंदुस्थानच्या संरक्षण फळीने जोमाने खेळ करायला हवा.

नेदरलॅण्डबाबत बोलायचे झाल्यास या संघाने स्पर्धेत आतापर्यंत 18 गोल केले आहेत. शिवाय वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थान-नेदरलॅण्ड या संघांची सहा वेळा गाठ पडली असून सर्व लढती नेदरलॅण्डने जिंकलेल्या आहेत. मागील नऊ लढतींकडे पाहिले तर उभय संघांनी 4-4 सामने जिंकले असून एक लढत ड्रॉ झालेली आहे. 1971 पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत हिंदुस्थानने केवळ एकदा 1975मध्ये किताब जिंकला होता. गतवेळी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या नेदरलॅण्डने (1973, 1990, 1998) तीन वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. त्यामुळे यजमान हिंदुस्थानपुढे उद्या नेदरलॅण्डचे कडवे आव्हान असेल. दुसऱ्या उपांत्यपूर्व लढतीत जर्मनी-बेल्जियम भिडणार आहेत.

‘आता बाद फेरीच्या थरारासाठी आमचा संघ सज्ज आहे. मोठ्या संघांविरुद्ध खेळण्याचा आम्हाला अनुभव असून नेदरलॅण्डलाही आम्ही हरवू शकतो. हिंदुस्थानी संघ आक्रमक हॉकी खेळत असून या रणनीतीमध्ये बदल होणार नाही. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानी संघ नक्कीच रिकाम्या हाताने परतणार नाही….हरेंद्र सिंह, प्रशिक्षक, हिंदुस्थान

‘हिंदुस्थानविरुद्धची लढत आव्हानात्मक आहे. घरच्या मैदानावर प्रेक्षकांचा पाठिंबा अर्थात हिंदुस्थानला असला तरी आम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही. मात्र, भरलेल्या मैदानावर खेळण्याचा आम्हाला चांगलाच अनुभव असून आम्ही केवळ खेळावर लक्ष केंद्रित करणार आहोत.’..मॅक्स केलडास, प्रशिक्षक, नेदरलॅण्ड