
सामना ऑनलाईन । मुंबई
व्हायरस म्हटले की, आठवते ते आजारपणच. कॉम्प्युटर वापरणाऱ्यांना तर व्हायरसचे नाव काढले तरी कापरे भरते. मात्र सिंगापूरच्या शास्त्रज्ञांनी आता या व्हायरसच्या मदतीनेच कॉम्प्युटरचा स्पीड आणि रॅमचादेखील स्पीड वाढवण्याचे तंत्रज्ञान शोधून काढले आहे. विशेष म्हणजे यासाठी जैविक व्हायरसचा वापर करण्यात आला आहे. ‘अप्लाईड नॅनो मटेरियल्स जर्नल’मध्ये यासंदर्भातला शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. शास्त्रज्ञांनी एम-13 बॅक्टेरिया व्हायरसच्या मदतीने हे तंत्रज्ञान तयार करण्यात यश मिळवलं आहे. कॉम्प्युटरचा स्पीड वाढवण्यासाठी त्याच्या मिलिसेकंद टाइम डिलेला कमी करण्याची आवश्यकता असते. कारण हा टाइम डिले होण्याचे कारण हे मुख्यतः कॉम्प्युटरची रॅम अर्थात रँडम ऍक्सेस मेमरी आणि हार्ड डिस्कमधील डाटा ट्रान्स्फर आणि स्टोरेज असते. सिंगापूरस्थित युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड डिझाइनच्या शास्त्रज्ञांनी यावर काम करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या लक्षात आले की, नॅनो टेक्नॉलॉजीच्या मदतीने कॉम्प्युटर आणि जैविक व्हायरस यांची एकत्र सांगड घालता येईल आणि कॉम्प्युटरचा स्पीड वाढवण्यासाठी त्याची मदत होईल. ‘फेज-चेंज मेमरी’ असे नाव सध्या या तंत्रज्ञानाला देण्यात आले आहे. ही रॅमसारखीच वेगवान असते आणि त्यात हार्ड डिस्कपेक्षादेखील जास्त डाटा स्टोअर होऊ शकतो.






















































