
सामना प्रतिनिधी, कोल्हापूर
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढू लागला असतानाच शनिवारी कडाक्याच्या थंडीत लक्ष्मीपुरी कोंबडी बाजार येथील 60 ते 65 वयोगटातील दोघा फिरस्त्यांचा गारठून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी समोर आली. खंडेराव दिनकरराव कारंडे ‘61, रा. नंदवाळ फाटा, कोल्हापूर) असे एकाचे नाव असून दुसऱ्याचे नाव समजू शकले नाही.
गेल्या आठ दिवसांत गारठा जाणवत आहे. दोघे फिरस्ते वृद्ध लक्ष्मीपुरी कोंबडी बाजार परिसरात गेल्या महिनाभरापासून वास्तव्याला होते. परिसरातील फेरीवाले, वडापावच्या गाड्यांवर भीक मागून ते उदरनिर्वाह करीत होते. लोकांनी दिलेली कपडे अंथरुण ते दुकानाच्या पायऱ्यांवर झोपत होते. शनिवारी रात्री कोंबडी बाजार परिसरात एका दुकानाच्या पायरीवर झोपलेल्या अवस्थेत थंडीने गारठून त्यांचा मृत्यू झाला. आठवडा बाजारासाठी आलेल्या नागरिकांनी दुकानदारांना याची माहिती दिली. त्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले.






























































