
सामना प्रतिनिधी । नांदेड
शिवसेना आमदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड जिल्हा शिवसेना व गोदावरी परिवाराच्या वतीने आयोजित गोदावरी महोत्सवाचा समारोप सोमवारी रात्री दमदार झाला. महाराष्ट्राची प्रख्यात कलावंत ऐश्वर्या बडदे व तिच्या संचाने सादर केलेल्या ” करते तुम्हा मुजरा” या पारंपारिक गिते व लावण्यांच्या बहारदार मैफिलीने नांदेडकर रंगून गेले होते.
गेली तीन दिवस नांदेडच्या गोदावरी तटावर बंदाघाट येथे गोदावरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसात वाढलेली थंडी व त्यामुळे निर्माण झालेला गारवा यामुळे रसिक, प्रेक्षक येतील की नाही अशी शंका संयोजकांना वाटत होती. मात्र बंदाघाटचा एकही कोपरा रात्री शिल्लक नव्हता. जवळपास दहा ते पंधरा हजार प्रेक्षकांनी सहकुटुंब माधुरी बडदे व त्यांच्या संचाने सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस गितांना जोरदार प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात ‘नटरंग उभा, ललकारी नभा’ या गीताने झाली. त्यानंतर संचातील सर्व कलावंतांनी मानाचा मुजरा दिला. ‘यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी’ या गवळणीने बहार केली. त्यानंतर सुरु झाल्या एकापेक्षा एक सरस अशा पारंपारिक लावण्या.’ नटले तुमच्यासाठी राजसा, विडा रंगला ओठी’ या लावणीने लावणी परंपरेला सुरुवात झाली. त्यानंतर ऐश्वर्याने सादर केलेल्या ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’ या लावणीला वन्समोअर मिळाला. त्यानंतर अल्काने सादर केलेल्या ‘कारभारी दमानं’ या नृत्याला जोरदार टाळ्या मिळाल्या. स्मृती बडदे या हावभाव व अदाकारीने परिपूर्ण असलेल्या कलावंताने ‘झाल्या तिन्ही सांजा’ ही लावणी सादर करुन या महोत्सवात बहार आणली.
नांदेडच्या दोन कलावंतांनी ‘या रावजी बसा भावजी’ आणि ‘सोडा की हो राया, नाद खुळा’ या लावण्या सादर करुन ‘हम भी कुछ कम नही’चा प्रत्यय दिला. त्यानंतर संचातील अन्य कलावंतांनी ‘गेली कुठ गावना, जरा खाजवा की’ ही लावणी सादर करुन प्रेक्षकांचा उत्साह वाढविला. ऐश्वर्याने सादर केलेल्या ‘मिशीवर ताव मारतोय भाव’ ही अस्सल मराठमोळी लावणी सादर करुन वन्समोअर घेतला. त्यानंतर ‘आज काल पाटलाचा, लई रुबाब बाई, लय रुबाब’ ही आग्रहाची लावणी सादर करुन महिलांनाही नाचावयास भाग पाडले. ऐश्वार्याने सादर केलेल्या ‘कुणी समजावून सांगा माझ्या नवऱ्याला’ या लावणीने तर हशास पिकला. स्मृतीने सादर केलेल्या ‘जवानीचा मसाला’ ही लावणीही चांगलीच गाजली. ऐश्वार्याने सादर केलेली ‘बाई मी लाडाची, कैरी पाडाची’ या लावणीला रसिक, प्रेक्षकांत एक नवी जाण आणली. ‘आहो आबा सरकून बसा की नीट ‘ही अल्काने सादर केलेली लावणी रसिकांना चांगलीच भावली. प्रिती बडदे हिने सादर केलेल्या ‘कुठ कुठ जायच हनीमुनला’ या लावणीलाही वन्समोअर मिळाला. त्यानंतर ऐश्वार्याने सादर केलेली ‘मला जाऊ द्या न घरी, आता वाजले की बारा’ ही लावणीही प्रेक्षकांनी उचलून धरली. तिनेच सादर केलेल्या ‘जवा बघतीस तू माझ्याकड, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ ही लावणीही चांगलीच गाजली. प्रख्यात निवेदक सिध्देश सोनवडेकर यांनी सादर केलेला शिवाजी महाराजांवरचा सादर केलेला पोवाडा सगळ्याच भावून गेला. स्मृतीने सादर केलेल्या ‘तुम्हा वर केली मी मर्जी बहाल’ या लावणीने कार्यक्रमाचा समारोप झाला.
आमदार हेमंत पाटील आणि राजश्री हेमंत पाटील यांनी गोदावरी महोत्सवाच्या निमित्ताने गोदावरीचा घाट व परिसर स्वच्छ करण्याची मोहिम यशस्वी झाल्याने हा महोत्सव खऱ्या अर्थाने सार्थ झाला, अशा भावना व्यक्त करुन याकामी सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे, शिवसैनिकांचे व विशेष करुन महिलांचे आभार मानले.






























































