
सामना प्रतिनिधी । मुंबई
दहावीचा पेपर पॅटर्न यंदा बदलला असून शाळेमार्फत भाषा विषयांसाठी देण्यात येणारे अंतर्गत गुणही बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे शंभर गुणांचा मराठी भाषेचा पेपर विद्यार्थ्यांना सोडवावा लागणार आहे. या विषयात विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुण मिळावेत यासाठी मुंबईतील 300 शाळांचे शिक्षक एकवटले असून मराठी विषय शिक्षकांसाठी उद्बोधन वर्ग सुरू करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघ मुंबई विभागाने मराठी विषय शिक्षकांसाठी या उद्बोधन वर्गाची सुरुवात केली आहे. घाटकोपर येथील विद्याभवन हायस्कूलमध्ये उत्तर विभागातील 150 व खार येथील अनुयोग विद्यालयात पश्चिम विभागातील 150 शाळांमधील शिक्षकांना अध्यापक संघाचे विजयकुमार लांडगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुंबई मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे, अनुयोग विद्यालयाचे संस्थापक सतीशचंद्र चिंदरकर, मनीषा घेवडे, शिक्षण उपनिरीक्षक संदीप पाटील आदी उपस्थित होते.
दहावीच्या पाठय़पुस्तकातील उपयोजित लेखनमधील पत्रलेखन, सारांश लेखन, जाहिरातलेखन, बातमीलेखन, कथालेखन, लेखन कौशल्य, रसग्रहण, रूपककथेचे स्वरूप शिक्षकांना समजावून सांगितले. औपचारिक व अनौपचारिक पत्रांमधील फरक, सारांशलेखनातील महत्त्वाचे मुद्दे, जाहिरात लेखन करताना विचारात घ्यावयाच्या सूचना, बातमीलेखनाची तंत्रे, कथालेखनाचे प्रकार, रसग्रहण, निबंधलेखन यावर शिक्षकांच्या शंकांचे निरसन केले. ठाणे व नवी मुंबईतील शिक्षकांसाठी पुढील महिन्यात मराठी विषयाचे उद्बोधन वर्ग आयोजित करण्यात येणार असून सुमारे 500 शाळांमधील शिक्षक यामध्ये सहभागी होणार आहेत.


























































