
सामना प्रतिनिधी। सिंधुदुर्गनगरी
सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करणे आणि कमलेशचंद्र समितीच्या शिफारशी लागू कराव्यात या मागण्यांसाठी ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक यूनियनने 18 डिसेंबर पासून बेमुदत संपावर गेली आहे. संपाच्या दुसर्या दिवशीही जिल्ह्यातील सहाशे ग्रामीण डाक सेवक संपावर गेल्याने ग्रामीण भागातील डाकसेवा कोलमडली आहे. दरम्यान, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी सकाळी दहा वाजता येथील अधीक्षक डाक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना सिंधुदुर्गचे सेक्रेटरी जे एम मोडक यांनी दिली आहे.
ग्रामीण डाक सेवक यांना लागू करण्यात आलेल्या सातवा वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यात याव्यात, कमलेश चंद्र समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, पेंशन योजना लागु करावी, कंत्राटी ग्रामीण डाक सेवकांना ८ तासाचे काम देवून त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागण्यांकडे संघटने मार्फ़त शासनाचे वारंवार लक्ष वेधण्यात आले मात्र त्याची पूर्तता झाली नाही. त्यामुळे ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक यूनियन १८ डिसेंबर पासून बेमुदत संपावर गेली आहे . जिल्ह्य़ातील सहाशे ग्रामीण डाक सेवक यात सहभागी होवून संप शंभर टक्के यशस्वी करत असल्याचे सचिव मोडक यांनी सांगितले.
आपल्या विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक यूनियन 18 डिसेंबर पासून संपावर असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या गुरूवारी सिंधुदुर्गनगरी येथील अधीक्षक डाक कार्यलयावर शेकडोंच्या उपस्थितीत धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन जे एम मोडक यांनी केले आहे.
































































