१२ वर्षानंतरही एमआयडीसीचे भूखंड लाभार्थ्यांना देण्यात कुचराई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी । लातूर

शासकीय योजना कधी लवकर राबून, गरजू लाभार्थींना त्यांचा वेळीच व उचित लाभ झाला नाही, अशी वर्षानुवर्षांची वाईट परंपरा महाराष्ट्राच्या प्रशासनाने मोठ्या काळजीने जोपासली आहे. त्यामुळे प्रशासनाप्रति जनतेत प्रचंड असंतोष असुन लातूरच्या अतिरीक्त एमआयडीसीतील भूखंड १२ वर्षानंतरही एमआयडीसीचे वरिष्ठ मिळू देत नसल्याने, इसारा रक्कम भरून चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या त्या ७४ भूखंड मागणीधारकांनी १० जानेवारी २०१९ रोजी लातूर एमआयडीसी प्रादेशिक कार्यालयाला चक्क टाळे ठोकण्याचा इशारा प्रादेशिक अधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.

या निवदेनात वैतागलेल्या ७४ उद्योजकांनी म्हटले आहे की, सन २००६ ते २०१० या कालावधीत लातूर शहरातील विविध क्षेत्रातील ७४ उद्योजक, संपादकांनी लातूरच्या अतिरिक्त एमआयडीसीमध्ये भूखंडाची रितसर मागणी केली होती. त्यासाठीची त्यावेळेची इसारा रक्कमही भरली त्यानंतर भूखंड मिळण्यासाठी लातूर ते मुंबई कार्यालयापर्यंत चकरा मारल्या तरीही काहीच तोडगा निघेना आणि संबंधित अधिकारी थांग पत्ता लागू देईनात. शेवटचा पर्याय म्हणून या उद्योजकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दरबारात दीड वर्षाखाली धाव घेतली. तेव्हा कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्यांनी एमआयडीसीचे संबंधित अधिकारी व उद्योजकांचे म्हणणे ऐकून घेवून तीन महिन्यात निर्णय घेण्याबाबत उद्योग विभागाला सूचीत केले होते. त्यानंतर एमआयडीसी बोर्ड कमिटीसमोर हा विषय आला, त्यावर कमिटीने त्या काळात एमआयडीसीचे जेवढे होते तेवढेच पैसे निश्चित केले होते ते ग्राह्य धरुन भूखंड वाटप करण्यास मंजूरी दिली. तथापि गेली दीड वर्षांपासून उच्च पदस्थ पातळीवरचे अधिकारी या ७४ भूखंडधारकांना भूखंड देण्यासंदर्भात ठोस कारवाई करत नाहीत, असाच अनुभव आला. म्हणून त्यांनी लातूर ग्रामीणचे आमदार त्र्यंबक नाना भिसे यांच्याकरवी विधिमंडळात तारांकित प्रश्न मांडला. त्यावेळी उद्योगमंत्र्यांनी एक महिन्याच्या आत ७४ भूखंडधारकांना भुखंड वाटप करण्याचे गेल्या पावसाळी अधिवेशनात उत्तर दिले होते. त्यानंतरही उद्योजक लातूर ते मुंबई पर्यंत एमआयडीसीच्या कार्यालयाकडे चकरा मारत असून त्यांच्या हातात आजही काहीच पडत नाही म्हणून शेवटचा पर्याय म्हणून लातूरच्या एमआयडीसी प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी यांची भेट घेवून निवेदन सादर केले. त्यात १० जानेवारी २०१९ पर्यंत भूखंड देण्याबाबत निर्णय नाही झाल्यास याच दिवशी प्रादेशिक कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा दिला.

या शिष्टमंडळात प्रशांत पाटील, वामन धुमाळ, धनंजय भूरके, राज मुंदडा, रघुनाथ निगडीकर, लक्ष्मण पाटील, नागेश कनडे यांच्यासह अनेक उद्योजकांचा समावेश होता.